पेट्रोल पंपांवर सुविधांची वाणवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:23 IST2017-07-18T00:23:18+5:302017-07-18T00:23:18+5:30

ई-पेट्रोल चोरीचा मुद्दा सध्या चर्चेत असून काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील वरोरा येथील एका पेट्रोल पंपाची पुणे येथील गुन्हे शाखेच्या चमूने तपासणी केली.

Convenience of petrol pumps | पेट्रोल पंपांवर सुविधांची वाणवा

पेट्रोल पंपांवर सुविधांची वाणवा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ई-पेट्रोल चोरीचा मुद्दा सध्या चर्चेत असून काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील वरोरा येथील एका पेट्रोल पंपाची पुणे येथील गुन्हे शाखेच्या चमूने तपासणी केली. पेट्रोल कमी मिळत असल्याच्या अनेकांच्या तक्रारी येत असल्या तरी एकदा वाहनात टाकलेले पेट्रोल, डिझेल मोजता येत नसल्याने तक्रार करण्यास अनेकांची अडचण होत आहे. अशातच पंपचालकांकडून वाहनधारकांना सुविधा पुरविण्याकडेही सर्रास दुर्लक्ष केले आहे. पंपावर निशुल्क हवा तपासून देण्याचा नियम असतानाही चक्क पैसे मोजावे लागत असल्याचा प्रकार जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपावर सुरू आहे.
पेट्रोल पंपावर नियंत्रण ठेवण्याचे काम पुरवठा विभागाकडून केले जाते. तक्रारीही याच विभागाकडे येत असतात. मात्र या विभागाला कार्यवाहीचे अधिकार नसल्याने पंपचालकांचे चांगलेच फावत आहे. केवळ तपासणी करून कार्यवाहीचा अहवाल पाठवण्यिाची कार्यवाही पुरवठा विभाग करीत असतो.
तर कार्यवाही करण्याचे अधिकार संबंधित पेट्रोलिअम कंपनीला असते. मात्र ग्राहकांच्या तक्रारीवरून पंप चालकावर कार्यवाही झाल्याचे आजपर्यंत तरी घडलेले नाही. अशात वाहनधारकांची मोठ्या प्रमाणात लूट होत असून पंपावरील सुविधांबाबत अनभिज्ञता असल्याने कुणीच तशी तक्रारही करीत नाही. त्यामुळे पंपचालकांचे चांगलेच फावत आहे.

ग्राहकांचे पेट्रोल पंपवरील ११ अधिकार
पेट्रोल-डिझेल खरेदी करणाऱ्यांच्या गाडीत मोफत हवा भरण्याची व्यवस्था करणे, पेट्रोल पंपाची जबाबदारी आहे. यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागत नाही.
ग्राहकाला तहान लागल्यास त्याच्यासाठी पेट्रोल पंपवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असणे आवश्यक आहे.
शौचालयाची व्यवस्था करणे पेट्रोल पंपाची जबाबदारी आहे. यासाठी ग्राहकांकडून कोणताही चार्ज घेता येत नाही.
ग्राहकांना हेही जाणून घेण्याचा अधिकार आहे की, आगीपासून बचावासाठी पेट्रोल पंपवर अग्निशामक उपकरणे सँड बकेट्सची व्यवस्था आहे अथवा नाही.
पेट्रोलचे खरेदी केल्यानंतर बिल मागण्याचा अधिकार आहे. जर का धोका झाला तर या बिलावरुन तुम्ही तक्रारही दाखल करु शकता.
आपातकालीन परिस्थितीत ग्राहकाला पेट्रोल पम्पावर एक फोन करण्याचा अधिकार आहे. हा कॉल ‘फ्री आॅफ चार्ज’ असतो.
एखाद्या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीसाठी प्रथमोपचाराची पेटी पेट्रोलपंपवर असणे गरजेचे आहे.
जर चिटींग झाली, तर तक्रार करण्याचा तुम्हाला अधिकार आहे. यासाठी पंपावर तक्रार वही किंवा तक्रारपेटी आवश्यक आहे.
ग्राहकांना पेट्रोलची किंमत माहिती करुन घेण्याचा अधिकार आहे. याकरिता पेट्रोल पंपावर मोठ्या अक्षरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती लिहिलेल्या असाव्यात.
सर्वांना पेट्रोल आणि डिझेलची क्वालिटी तपासण्याचा अधिकार आहे. तुमच्याकडून घेण्यात आलेल्या पैशावर योग्य क्वालिटीचे पेट्रोल मिळते वा नाही, हे तपासण्याचा अधिकार आहे.
पेट्रोलचे योग्य मोजमाप करण्यासाठी पाच लिटरचे माप ठेवणे बंधनकारक आहे. या मापाची प्रत्येक वर्षी वजनमापे विभागाकडून तपासणी झाली पाहिजे.

ग्राहकाच्या तक्रारीवरून चौकशी करण्याचे अधिकार पुरवठा विभागाला आहे. मात्र आम्ही पंपचालकावर कार्यवाही करू शकत नाही. कार्यवाहीचा प्रस्ताव तयार करून संबधीत पेट्रोलिअम कंपनीला पाठविले जाते. कार्यवाही करणे किंवा न करणे हे पेट्रोलिअम कंपनीचे काम आहे. त्यामुळे पंपचालकांत आमची भिती उरलेली नाही.
- आर. आर. मिस्कीन
जिल्हा पुरवठा अधिकारी, चंद्रपूर.

चंद्रपुरातील काही पंपावर कमी पेट्रोल मिळत असते. मात्र ते स्पष्ट करून देता येत नसल्याने तक्रार करता येत नाही. अशाप्रकारे वाहनधारकांची लूट सुरू असून कितीही उपाययोजना केल्या तरी पंपचालक वाहनधारकांची लूट करतात. शासनाच्या निर्देशानुसार अनेक ठिकाणी सुविधा नसून याकडे आमचेही दुर्लक्ष होते.
- प्रमोद बुरांडे, तुकूम, चंद्रपूर.

पेट्रोल पंपवर सर्व सुविधा आहे. कर्मचारी नसल्यास काही वेळेस हवा भरण्याची मशीन बंद असते.
- आशिक अब्बास, शब्बीर आॅईल एजन्सी, वरोरा.

Web Title: Convenience of petrol pumps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.