स्मशानभूमी विकासाच्या मुद्यावरून मनपाच्या आमसभेत वादंग

By Admin | Updated: December 29, 2016 02:05 IST2016-12-29T02:05:08+5:302016-12-29T02:05:08+5:30

चंद्रपूर महानगर पालिकेची बुधवारची आमसभा सत्ताधारी आणि विरोधकांच्या वादाने गाजली. स्मशानभूमी

Controversy in MMC's General Assembly on the issue of graveyard development | स्मशानभूमी विकासाच्या मुद्यावरून मनपाच्या आमसभेत वादंग

स्मशानभूमी विकासाच्या मुद्यावरून मनपाच्या आमसभेत वादंग

सत्ताधारी-विरोधक समोरासमोर : महापौर झाल्या संतप्त
चंद्रपूर : चंद्रपूर महानगर पालिकेची बुधवारची आमसभा सत्ताधारी आणि विरोधकांच्या वादाने गाजली. स्मशानभूमी विकासाच्या विषयावरून एकमेकांच्या समोरासमोर आलेले नगरसेवक व त्यांनी महापौरांच्या आसनापुढे घातलेल्या गोंधळामुळे सभेला वादाचे रूप आले.
दाताळा मार्गावरील इरई नदीकाठावरील स्वर्गधाम स्मशानभूमीच्या विकासाच्या मुद्यावरून हा प्रसंग ओढावला. इरई नदीकाठावर सिंधी समाजाची स्मशानभूमी आहे. येथे अंत्यसंस्कारासाठी जाणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठी आणि अंत्यसंस्कारासाठी शेड उभारण्याच्या कामावर २० लाख रूपये देण्यासंदर्भातील प्रस्ताव मागील बैठकीत आला होता. मात्र हे क्षेत्र मनपाच्या हद्दीबाहेर असल्याने या विषयाला विरोध झाला होता. मनपाच्या बैठकीदरम्यान काँग्रेसचे गटनेते प्रशांत दानव यांच्यासह अन्य नगरसेवकांनी यावर आक्षेप घेतला होता. पुढे हे प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी दाताळा ग्रामपंचायतीकडून ना हरकत पत्र मागविले होते. आजच्या सभेत नगरसेवक बलराम डोडानी यांनी हा मुद्दा उचलल्याने काँग्रेसचे प्रशांत दानव, प्रवीण पडवेकर, सुनिता लोढिया, प्रदीप डे यांनी विरोध केला. ग्रापंचायतीचे प्रमाणपत्र आल्यावर या विषयावर चर्चा होऊ द्या, असे या नगरसेवकांचे म्हणणे होते. तर सत्तापक्षाकडून रामू तिवारी व इतर सदस्यांनी या विषयाला मंजुरी द्यावी, अशी मागणी रेटून धरली. तर अन्य सदस्यांनी या विषयाला आता मंजुरी द्यावी, मात्र ना हरकत पत्र आल्यावरच कामाला मंजुरी द्यावी, असा सूर लावून धरला. यावरून सभागृहात बराच काळपर्यंत कल्लोळ माजला. अखेर महापौरांनी या विषयावर हात उंचावून सदस्यांचे मत जाणून घेतले असता समर्थकांचीच संख्या अधिक आली. त्यामुळे दाताळा ग्रामपंचायतीचे ना हरकत पत्र मनपाला मिळाल्यावर काम सुरू करण्यास मंजुरी दिली जाईल, असे त्यांनी जाहीर केले. यावर आक्षेप घेत प्रशांत दानव व कांग्रेसचे अन्य सदस्य आपल्या आसनावरून उठून थेट महापौरांच्या आसनापुढे आले. हे बघून सत्ताधारी सदस्यही उभे झाले. दोन्ही बाजूंकडून होणाऱ्या शेरेबाजीमुळे या गदारोळात अधिकच भर पडली. एका क्षणी तर, विरोधी सदस्यांनी सभाध्यक्ष महापौर राखी कंचर्लावार यांच्या असनापुढे येवून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. यावर महापौरांनी संताप व्यक्त करीत सदस्यांना बाहेर जाण्यास बजावले अन्यथा निलंबनाची कारवाई करण्याची तंबी दिली. (जिल्हा प्रतिनिधी)

अवैध बांधकामाविरोधात कारवाई होणार
४नगरसेविका सुनिता लोढिया यांनी पार्किंग नसणाऱ्या इमारतींचा आणि रूग्णालयांचा मुद्दा उचलला. त्या म्हणाल्या, आपल्या प्रभागात काही प्रार्थनास्थळे आणि रूग्णालये आहेत. मात्र पार्किंगची व्यवस्था कुठेच नाही. डॉ. मेहरा यांच्या रूग्णालयासमोर असलेली नझुलची जागा फक्त १०० रूपयांच्या स्टँम्प पेपरवर परस्पर विकली जात आहे. शहरात अनेक रूग्णालयांपर्यंत अग्नीशामक दलाचे वाहन पोहचण्याईतपतही रस्ता नाही. त्यावरून आपल्या शहरात अतिक्रमण विभाग आहे की नाही, असा प्रश्न पडतो. लोढीया यांच्या या मुद्यावर अनेक नगरसेवकांनीही सहमती दर्शविली. यावर आयुक्त काकडे म्हणाले, मनपाने अवैध प्रार्थनास्थळे हटविण्याची मोहीम हाती घेतली आहे. मनपाकडे मनुष्यबळ कमी आहे. मात्र या संदर्भात विशेष मोहीम चालवून रूग्णालये आणि हॉटेल्सची चौकशी केली जाईल आणि दोषींवर कारवाई केली जाईल, अस आश्वासन त्यांनी सभागृहाला दिले.
निरूपयोगी शौचालयांच्या जागेवर उभारणार अभ्यासिका आणि बागा
४शहरात वापरात नसलेल्या आणि निरूपयोगी असलेल्या शौचालयांच्या जागेवर अभ्यासिक आणि बागा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. नगरसेविका अंजली घोटेकर यांनी हा प्रस्ताव मांडला होता.
महापौर चषक होणार
४चंद्रपुरात महापौर चषक स्पर्धेचे आयोजन करण्यासंदर्भात चर्चा झाली. यावर विरोधी सदस्यांनी आक्षेप घेत, खेळावर ३५ लाख रुपये खर्च करण्यापेक्षा शेतकरी मदत निधीमध्ये ही रक्कम जमा करावी, असा मुद्दा मांडला. मात्र सत्ताधारी सदस्यांनी याला विरोध दर्शविला. यावर चर्चा सुरू असतानाच नगरसेविका वनश्री गेडाम यांनी या शहराच्या अदिवासी संस्कृतीची ओळख कायम राहावी यासाठी महापौर चषक स्पर्धेत किमान आदिवासी नृत्य तरी ठेवा, असा मुद्दा मांडला. त्यावर सहमती व्यक्त करीत महापौरांनी सभा समाप्त झाल्याची घोषणा केली.
४दरम्यान, काँग्रेसचे गटनेते प्रशांत दानव यांनी सदस्यांच्या स्वाक्षऱ्यांसह महापौरांना एक पत्र दिले असून, हा विषय रद्द करून ही निधी शहरातील विविध विकासकामासाठी वापरावी, प्रभागातील लहानमोठी कामे या रकमेतून करावी, अशी विनंती केली आहे.

निषेध बॅनर घेऊन हजारे पोहोचले सभागृहात
४सभा सुरु असतानाच तुकूम तलाव प्रभागाचे नगरसेवक बंडू हजारे काळी रिबीन बांधून आणि हातात निषेधाचा बॅनर घेवून सभागृहात प्रवेशले. प्रशासनाच्या चुकीच्या सर्व्हेक्षणामुळे ताडोबा मार्गावरील रस्तायापासून २० फुट आत असलेले हनुमान मंदिर तोडण्याचा आदेश आला असल्याचे त्यांनी सभागृहाला सांगितले. ते म्हणाले, शहरात हिंदूंची मंदिरे तोडली जात आहेत, हा अन्याय आहे. हे थांबविण्याची मागणी त्यांनी केुली. त्यावर, आयुक्त संजय काकडे यांनी, हस्तक्षेप करीत न्यायालयाच्या आदेशाने ही कारवाई सुरू असल्याने यावर सभागृहात चर्चा होऊ शकत नाही, असे स्पष्ट केले.

Web Title: Controversy in MMC's General Assembly on the issue of graveyard development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.