बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत वादंग
By Admin | Updated: December 29, 2016 02:13 IST2016-12-29T02:13:25+5:302016-12-29T02:13:25+5:30
येथील श्री कन्यका नागरी सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत बँकेचे अध्यक्ष डॉ.

बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत वादंग
चंद्रपूर : येथील श्री कन्यका नागरी सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत बँकेचे अध्यक्ष डॉ. विजय आईंचवार यांच्या विरूद्ध संचालकांनीच एकत्रीत येवून विरोधाचा सूर लावला. संचालकांना विश्वासात न घेता निर्णय घेणे आणि तत्कालीन सीईओ रमेश दुब्बावार यांना निलंबित करण्याच्या मुद्यावरून या बैठकीत बरीच गरमागरमी झाल्याची माहिती आहे.
संचालकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बऱ्याच दिवसांनी बैठक आयोजित केल्याने संचालक नाराज होते. याच दरम्यान अध्यक्ष डॉ. आर्इंचवार यांनी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश दुब्बावार यांना निलंबित केले. निलंबनाची जाहिरात वृत्तपत्रात प्रकाशित केली. याबद्दल बैठकीत संचालकांनी नाराजी व्यक्त केली. मागील काही दिवसांपासून अध्यक्ष आईंचवार आणि सीईओ दुब्बावार यांच्यात फारसे पटत नव्हते. यामुळे हा वाद वाढत जावून अध्यक्षांनी त्यांना निलंबित केले. मात्र त्याची कल्पना संचालकांना नव्हती, त्याचे पडसाद या बैठकीत उमटले.
२७ डिसेंबरला झालेल्या या बैठकीत अध्यक्ष विरूद्ध सर्व संचालक अशी स्थिती निर्माण झाली होती. सूत्रानुसार, या बँकेचे संचालक असतानाही रमेश मामीडवार हे सदस्य असलेल्या सरदार पटेल मेमोरियल ट्रस्ट, चंद्रपूर या संस्थेला चार वर्षांपूर्वी अडीच कोटी रूपयांचे कर्ज देण्याचाही मुद्दा या बैठकीत गंभीरपणे चर्चेेस आला. हा व्यवहार नियमानुसार झाला नसल्यास त्यांना संचालक पदावरून हटविले जावे, अशीहीे मागणी करण्यात आली. अखेर हा विषय ताणून धरण्यापेक्षा सामंजस्याने मार्गी लावण्याचे ठरले. याच वेळी दुब्बावार यांच्या निलंबनाचे आदेश मागे घेण्याचेही बैठकीत ठरले. संचालकांच्या दबावामुळे डॉ. आर्इंचवार यांनी दुब्बावार यांचे निलंबन रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र रमेश दुब्बावार यांनी स्वत: राजिनामा द्यावा, अशी अट डॉ. आर्इंचवार यांनी ठेवली. यावर संचालकांनी स्विकृती दर्शविल्याची माहिती आहे. या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी अध्यक्षांशी संपर्क साधला, मात्र संपर्क होऊ शकला नाही. मात्र बैठकीतील एका संचालकाने आपले नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर या घटनेला दुजोरा दिला. (जिल्हा प्रतिनिधी)