प्रियदर्शिनी चौकात कार्यकर्ते व पोलिसांत वादावादी
By Admin | Updated: October 16, 2014 23:22 IST2014-10-16T23:22:07+5:302014-10-16T23:22:07+5:30
धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्यानिमित्त कार्यक्रमस्थळाकडे निघालेल्या रॅलीतील कार्यकर्ते व वाहतूक पोलीस निरीक्षक यांच्यात रॅली पुढे नेण्यावरून चांगलीच वादावादी झाली. त्यामुळे काही काळ या परिसरात

प्रियदर्शिनी चौकात कार्यकर्ते व पोलिसांत वादावादी
चंद्रपूर: धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्यानिमित्त कार्यक्रमस्थळाकडे निघालेल्या रॅलीतील कार्यकर्ते व वाहतूक पोलीस निरीक्षक यांच्यात रॅली पुढे नेण्यावरून चांगलीच वादावादी झाली. त्यामुळे काही काळ या परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. प्रकरण रामनगर पोलीस ठाण्यात पोहचले. तत्पूर्वी सावरकर चौकात पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी सौम्य लाठीमार केला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मध्यस्ती करून हे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कार्यकर्ते तेथून निघून गेले. अनुचित घटना घडू नये, म्हणून शहरात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. ही घटना गुरूवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास स्थानिक प्रियदर्शिनी चौकात घडली.
या तणावामुळे प्रियदर्शिनी चौकात तीनही बाजुने जवळपास एक तास वाहतूक खोळंबली होती. स्थानिक आंबेडकर महाविद्यालय परिसरात धम्मचक्र अनुप्रर्वतन दिन समारंभानिमित्त गुरूवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास प्रियदर्शिनी चौकातून दोन वेगवेगळ्या रॅली जात होत्या. यातील पुढे असलेली रॅली काही क्षण तेथे थांबली. याचवेळी वाहतूक पोलीस निरीक्षक पुंडलिक सपकाळे तेथे पोहचले. तेथे रॅली पुढे नेण्याच्या कारणावरून सपकाळे व रॅलीतील कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच वांदग झाले. सपकाळे यांनी डॉ. बाबासाहेबांचा अपमान केला, असा आरोप यावेळी कार्यकर्त्यांनी केला. रॅलीतील शेकडो कार्यकर्ते रामनगर पोलीस ठाण्याकडे निघाले. पुंडलिक सपकाळे यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी त्यांनी सावरकर चौकात वाहतूक अडवून धरली. याचवेळी पोलिसांचा ताफा तेथे पोहचला. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी येथे सौम्य लाठीमारही केला. वरिष्ठ पोलीस अधिकारीही तेथे पोहचले. त्यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कार्यकर्ते तेथून निघून गेले. याचवेळी या मार्गावर एका इंडिका चालकाने दुसऱ्या एका वाहनाला धडक दिल्याने काहींनी इंडिकाच्या चालकाला वाहनाबाहेर ओढून मारहाण केली. सध्या तणावपूर्ण शांतता असून अनुचित घटना घडू नये, म्हणून पोलिसांनी शहरात बंदोबस्त वाढविला आहे. (प्रतिनिधी)