चंद्रपूर : शहरातील विविध रस्त्यांवर स्पोर्ट बाईक चालवून जीवघेणी स्टंटबाजी केली जात आहे. यामुळे अपघात होऊन अनेकांचा जीव जाण्याची वेळ आली आहे. दोन दिवसांपूर्वीच शहरात अशीच एक घटना घडली. त्यामुळे या घटनांना आळा घालण्यासाठी स्टंटबाज बाईकस्वारांवर कारवाई करण्याची मागणी इको प्रोने केली आहे. यासंदर्भात पोलीस प्रशासनाला निवेदन दिले आहे.
शहरातील चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बँकसमोरील घटना दुर्दैवी आहे. यात स्टंटबाजी करणाऱ्या युवकांकडून रस्त्याच्या एका बाजूने वाहतुकीचे नियम पाळत, कमी गतीने जाणाऱ्या व्यक्तिला अनियंत्रित बाईकस्वाराने धडक दिली. यात डोक्यास गंभीर दुखापत झाली आहे. या अपघाताच्या घटनेचे व्हिडिओसुध्दा व्हायरल झाले आहेत. यावर वेळीच आळा न घातल्यास अनेकांचा जीव जाण्याची शक्यता आहे. या घटनेत दोषी बाईकस्वारांची चौकशी करून कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यासंदर्भात पोलीस उपअधिक्षक (मुख्या.) चंद्रशेखर देशमुख यांना निवेदन देण्यात आले. यावेळी इको-प्रोचे बंडू धोतरे, नितीन रामटेके उपस्थित होते.