उमेदच्या पोषण परसबाग मोहिमेतून कुपोषणमुक्तीस हातभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:20 IST2021-07-18T04:20:34+5:302021-07-18T04:20:34+5:30
भोजराज गोवर्धन, मूल मूल : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून मूल तालुक्यात पोषण परसबाग मोहिमेंतर्गत पोषण परसबागेची अभिनव ...

उमेदच्या पोषण परसबाग मोहिमेतून कुपोषणमुक्तीस हातभार
भोजराज गोवर्धन, मूल
मूल : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून मूल तालुक्यात पोषण परसबाग मोहिमेंतर्गत पोषण परसबागेची अभिनव क्रांती घडवून आणण्यात उमेदच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे. तालुक्यातील अनेक गावांत पोषण परसबाग तयार करण्यात आले आहेत. यामुळे महिला आत्मनिर्भर होत असून कुपोषणमुक्तीसाठी हातभार लागत आहे.
शासनाच्या ग्रामीण विकास विभागामार्फत राज्यात उमेद अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत जिल्हा परिषद क्षेत्रानुसार प्रभाग संघ तयार करण्यात आले आहे. गावोगावी ग्रामसंघ निर्माण करण्यात आले आहेत. मूल तालुक्यात या अभियानामध्ये शेकडो बचत गट जुळले आहेत. राज्यात कोरोना संसर्ग फोफावत असताना टाळेबंदी लागू करण्यात आली होती. यामुळे अनेकांचा रोजगार बुडाला, याही परिस्थितीत नागरिकांना ताजा भाजीपाला उपलब्ध करून देण्यासाठी उमेद अभियानातील महिलांनी पुढाकार घेत अनेक गावात पोषण परसबाग तयार करून माफक दरात भाजीपाला विक्री केला.
उमेद अभियानातील महिला स्वयंसहाय्यता समूहाने गावागावांत माझी पोषण परसबाग तयार करण्याची एक अभिनव क्रांती उभी केली. तालुक्यातील चिमढा येथे गुरुवारी सरपंच कालीदास खोब्रागडे, उपसरपंच योगेश लेनगुरे, मूल तालुका अभियान व्यवस्थापक माया सुमटकर, समता महिला ग्रामसंघ चिमढाच्या अध्यक्ष जिवनकला लेनगुरे, तालुका व्यवस्थापक प्रकाश तुराणकर, नीलेश जीवनकर, प्रभाग समन्वयक हेमचंद बोरकर, अमर रंगारी, प्रभाग संघ व्यवस्थापक भावना कुमरे, कृषी व्यवस्थापक मयूर गड्डमवार, तालुका समन्वयक स्नेहल मडावी यांच्या प्रमुख उपस्थितीत चिमढा येथे माझी पोषण परसबाग मोहिमेला सुरुवात करण्यात आली. ही पोषण परसबाग तयार करण्यासाठी कृतीसंगम सखी, समुदाय संसाधन व्यक्ती यांनी अथक परिश्रम घेतले.
कोट
सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला निर्मिती : माया सुमटकर
पोषण परसबागेमुळे अनेक कुटुंबांना अन्नसुरक्षा, पोषण सुरक्षेचा प्रश्न निकाली निघण्यास मदत होणार आहे. यासोबतच कुपोषणमुक्तीसाठीही हातभार लागणार आहे. या पोषण परसबागेतून पिकविलेला भाजीपाला, फळभाज्या सेंद्रिय पद्धतीने तयार करण्यात येणार आहेत. ताजा आणि पोषक असा भाजीपाला या माध्यमातून नागरिकांना उपलब्ध होणार आहे.
माया सुमटकर,
मूल तालुका व्यवस्थापक, उमेद