खडकीतील कोलाम पितात दूषित पाणी

By Admin | Updated: March 4, 2016 00:59 IST2016-03-04T00:59:05+5:302016-03-04T00:59:05+5:30

गावात जेमतेम माणसं. सगळ्याचीच हलाखीची स्थिती, शेतीच्या आधाराने जीवन जगणाऱ्या कोलामांना प्यायलाही शुद्ध पाणी नाही.

Contaminated water in khalmak kalamam | खडकीतील कोलाम पितात दूषित पाणी

खडकीतील कोलाम पितात दूषित पाणी

ग्रामपंचायतीचे ढिसाळ नियोजन : नागरिकांना विविध आजारांची लागण
शंकर चव्हाण जिवती
गावात जेमतेम माणसं. सगळ्याचीच हलाखीची स्थिती, शेतीच्या आधाराने जीवन जगणाऱ्या कोलामांना प्यायलाही शुद्ध पाणी नाही. दूरध्वनी सेवा तर सोडा साधी बाजारपेठेत जायला रस्त्याचीही सोय नाही. आरोग्यांची काळजी घेणारे कर्मचारीही गावात कधी येत नाही. ही व्यथा आहे, खडकी रायपूर ग्रामपंचायतीमधील खडकी गुड्याची.
स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे निघून गेली. सत्ता बदलली लोकप्रतिनिधी बदलले. पण गुड्यातील समस्या सुटल्या नाही. आजही कोलामांना पाणी असूनही ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षितपणामुळे दूषित पाणी प्यावे लागत असल्याची वास्तविकता लोकमतने आॅन द स्पॉट भेट देऊन समोर आणली आहे.
केवळ १२ घरांची वस्ती. जेमतेम ५०-५५ जण गुड्यात वास्तव्यास असून संपूर्ण कुटुंबच दारिद्र्य रेषेखाली हलाखीचे जीवन जगत आहे. या छोट्याशा गुड्यात शिक्षणाचे प्रमाणही कमी आहे. दहावीपर्यंत चार तर बारावीपर्यंत एका मुलीने आपले शिक्षण पूर्ण केले आहे. कर्णू उत्तम मडावी हा युवक सन २०१२-१३ मध्ये गडचिरोली जिल्ह्यात पोलीस म्हणून लागला आहे. तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत आणि खडकी रायपूर असे ग्रामपंचायतीचे नाव असले तरी खडकीचा विकास मात्र अजून झालेला दिसत नाही. सुरुवातीला ७० घराची वस्ती या गुड्यात होती. पिढ्यानपिढ्या एकोप्याने राहणारा समाज समस्याला कंटाळून विखुरला गेला. आजघडीला या गुड्यात फक्त १२ घराची वस्ती आहे. स्वातंत्र्याच्या अनेक वर्षानंतरही गावात जायला धड रस्ता नाही. वाहन गावात कधी आले नाही. गुड्यातील लोकांना येण्याजाण्याकरिता सोयीचे व्हावे, यासाठी जिल्हा परिषद अंतर्गत रस्त्याची कामे केली. पण काही दिवसात रस्त्याची वाट लागली आहे.

विहिरीची संरक्षण भिंत पडली
येथील जनतेला शुद्ध व स्वच्छ पाणी पिण्यास मिळावे, यासाठी जलस्वराज्य प्रकल्पाअंतर्गत विहिरीचे बांधकाम झाले. संबंधित अधिकारी यांनी दुर्लक्ष केल्यामुळे कंत्राटदार विहिरीचे काम काळ्या रेतीने थातूर-मातूर करुन मोकळे झाले. अनेक वेळा तक्रारी दिल्या. मात्र कुणीही लक्ष दिले नाही. त्यामुळे वर्षभरातच विहिरीची संरक्षण भिंत पडली. आजही ती तशीच असून काही ठिकाणी भगदाड पडले आहे. त्यावर नागरिकांनी बचावासाठी दगडाचे ढिगळ बसवल्याचे दिसून आले. ही विहीर नागरिकांसाठी धोकादायकच आहे.
पिण्याचे पाणीही झाले लाल
विहीर धोकादायक असतानाही त्याच विहिरीवरुन पाणी पिण्यास न्यावे लागते. कारण शाळेसमोर असलेला हातपंप दोन वर्षापूर्वी बंद पडला आहे. अनेकवेळा तक्रारी केल्या. पण कुणीच लक्ष दिले नाही. विहीर धोकादायक तर आहेच; पण त्यातील पाणीही आता खराब झाले आहे. विहीर नाल्यालगत असल्याने काही ठराविक दिवसात पाण्याचा उपसा व नियमित ब्लिचिंग पावडर टाकणे आवश्यक आहे. मात्र असे होत नसल्याने नागरिकांना लाल पाणी प्यावे लागते.

Web Title: Contaminated water in khalmak kalamam