ग्रामीण भागात बँकांअभावी अडचण
चंद्रपूर : ग्रामीण भागामध्ये राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखा नाहीत. त्यामुळे नागरिकांना आर्थिक व्यवहार करताना अडचण निर्माण होत आहे. राष्ट्रीयीकृत बँकांना ग्रामीण भागात शाखा स्थापन करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी होत आहे. अनेक ग्राहकांना २० ते २५ कि.मी.ची पायपीट करून बँकेचा व्यवहार करावा लागतो.
कृषिपंप अजूनही विजेच्या प्रतीक्षेत
चंद्रपूर : शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना विजेवर चालणारे मोटरपंप देण्यात आले. शेतकऱ्यांनी वीजजोडणीसाठी डिमांडची रक्कम भरली. मात्र दोन वर्षांचा कालावधी उलटूनही वीजजोडणी मिळाली नाही. शेतकरी कार्यालयात चकरा मारत आहेत.
ओपन स्पेस बनले कचऱ्याचे केंद्र
चंद्रपूर : प्रत्येक वॉर्डात ओपन स्पेस तयार करून संरक्षक भिंती बांधण्यात आल्या. काही ठिकाणी लोखंडी गेट उभारण्यात आले. मात्र या ओपस स्पेसवर नियंत्रण न ठेवल्याने या ओपन स्पेसमध्ये कचरा टाकला जात आहे. नगर परिषदेच्या ढिसाळ कारभारामुळे शहरात स्वच्छतेचे काम मंदावल्याचे दिसते.
गोरक्षण संस्थेच्या निर्मितीची मागणी
चंद्रपूर : जिल्ह्यात गोरक्षण संस्था अत्यंत तोकड्या नाहीत. त्यामुळे अनेकदा बेवारस जनावरे तसेच कत्तलीसाठी जात असलेले जनावर पकडून चंद्रपूर जिल्ह्यात लोहारा येथे पाठवावे लागतात. गोरक्षण संस्था निर्माण करण्याची मागणी आहे. गोरक्षण संस्था निर्माण करण्यासाठी एखाद्या स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेण्याची गरज आहे. तेव्हाच गाेवंशाचे संरक्षण हाेऊ शकते.
दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण करावे
चंद्रपूर : केंद्र व राज्य शासनाने दिव्यांगांच्या हितासाठी अनेक योजना तयार केल्या आहेत. मात्र तालुक्यात योजनांची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे दिव्यांग विकासापासून वंचित आहेत. प्रशासनाने दिव्यांगांचे सर्वेक्षण करून विकास योजनांचा लाभ मिळवून द्यावी, अशी मागणी परिसरातील दिव्यांग व्यक्तींकडून करण्यात येत आहे.
तोट्यांअभावी पाणी वाया
चंद्रपूर : येथील नागरिकांकडे नळ आहेत; परंतु काही नागरिकांच्या नळाला तोट्या नाहीत. त्यामुळे ओव्हरफ्लो झाल्यानंतर तसेच पाणी भरून झाल्यानंतर उर्वरित पाणी वाया जाते. स्थानिक प्रशासनाने प्रत्येक नागरिकांच्या नळाला तोट्या लावणे बंधनकारक करावे, अशी मागणी होत आहे.
‘तंमुस’ला प्रशिक्षण द्या
चंद्रपूर : अनेक गावांमध्ये तंटामुक्त समित्या केवळ कागदोपत्री असल्याचे दिसून येते. गावात भांडणतंटे वाढत आहेत. मात्र समित्या तंटे मिटविण्यात अपयशी ठरत आहेत. त्यामुळे तंटामुक्त समित्यांना दरवर्षी प्रशिक्षण देण्याची गरज आहे. प्रशिक्षण दिल्यास भांडण व तंटे याेग्य प्रकारे साेडविण्यास मदत हाेईल.