अतिक्रमण कुरवाळत रस्त्यांचे बांधकाम

By Admin | Updated: February 17, 2015 01:22 IST2015-02-17T01:22:08+5:302015-02-17T01:22:08+5:30

महानगरपालिका झाल्यानंतर दोन वर्षानंतर चंद्रपुरात विकासकामे केली जात आहे. आता विकासकामांची

Construction of roads on encroachment kurawal | अतिक्रमण कुरवाळत रस्त्यांचे बांधकाम

अतिक्रमण कुरवाळत रस्त्यांचे बांधकाम

महापालिकाच उदासीन महापालिका होऊनही रस्ते रुंद झाले नाही नागरिकांनीही जागा सोडली नाही
रवी जवळे ल्ल चंद्रपूर
चंद्रपूर
महानगरपालिका झाल्यानंतर दोन वर्षानंतर चंद्रपुरात विकासकामे केली जात आहे. आता विकासकामांची गती वाढली आहे. मात्र विकासकामे करताना पुढे हे महानगर कसे सुटसुटीत दिसेल, याचा विचार केला जात नसल्याचे दिसते. महापालिका झाल्याने रस्ते रुंद होतील, असाही चंद्रपूरकरांना विश्वास होता. मात्र अतिक्रमणांना कुरवाळत, आहे त्याच जागेवर महापालिकेकडून रस्त्यांचे बांधकाम करण्यात येत आहे. त्यामुळे अरुंद रस्त्यांची समस्या कधी सुटेल काय, हा प्रश्न कायम आहे.
२०१२ मध्ये चंद्रपूरला महानगरपालिकेचा दर्जा मिळाला आणि चंद्रपूकरांमध्ये उत्साहाचे, आनंदाचे वातावरण निर्माण झाले. महानगरपालिका झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात निधी मिळेल, विविध योजना येतील आणि चंद्रपूर शहराचा चेहरामोहराच बदलेल, अशी आशाही येथील नागरिकांना होती. आशेप्रमाणे चंद्रपूर महानगरपालिकेला मोठ्या प्रमाणात निधी मिळत आहे. एलबीटी व विविध करांच्या माध्यमातून महानगरपालिकेचे उत्पन्नही वाढत आहे. नगरोत्थान, दलित वस्ती सुधार योजना, आदी योजनांमधून मोठा निधीही प्राप्त होत आहे. त्यामुळे आता विकासकामांचा धडाका सुरू करण्यात आला आहे. मात्र हा विकास रस्ते आणि नाल्या बांधण्यापुरताच मर्यादित दिसत आहे.
चंद्रपुरात नगरपालिका अस्तित्वात असताना शहर विकास आराखड्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. या काळात चंद्रपूरची लोकसंख्याही झपाट्यावे वाढत गेली. एका घरांचे त्याच ठिकाणी दोन घरे बांधण्यात येऊ लागली. त्यामुळे सहाजिकच रस्त्यांवर अतिक्रमण वाढत जाऊन रस्ते चांगलेच अरुंद झाले. शहर विकास आराखड्यात जे रस्ते १२-१५ फुटाचे असतील, ते प्रत्यक्षात सात-आठ फुटाचे झाले. रस्ते आणि नाल्यांचे बांधकाम करताना तेव्हा नगरपालिकेने अतिक्रमण हटवून, वेळप्रसंगी जागा संपादित करून शहर विकास आराखड्यासारखे रस्ते तयार केले नाही. जो रस्ता उखडला, तिथे आहे तेवढ्याच जागेवर रस्त्यांचे बांधकाम करण्यात येत राहिले. त्यामुळे एवढ्या वर्षातही रस्ते रुंद होण्याऐवजी ते गल्लीबोळात रुपांतरित होत राहिले. आता महानगरपालिका झाल्यानंतरही प्रशासनाने तोच कित्ता गिरविला आहे.
आतातरी शहरातील वॉर्डावार्डातील अंतर्गत रस्त्यांचे बांधकाम करताना रस्त्यावरील अतिक्रमण काढून रस्ते रुंद करून मग बांधकाम करणे आवश्यक होते. मात्र त्या भानगडीत न पडता महापालिका प्रशासनाकडून पुन्हा आहे त्याच जागेवर रस्त्यांचे बांधकाम करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, जिथे जागा नसेल, तिथेही हे रस्ते सरळ न जागा निमुळते होत आहेत. आताही महापालिकेने शहर विकास आराखड्याला बगल देत रस्त्यांचे बांधकाम सुरू ठेवल्याने पुढे या शहरातील रस्ते रुंद होतील काय, असा प्रश्न आपसुकच निर्माण होत आहे.
५८ कोटींचे रस्ते
चंद्रपूरच्या पंचशताब्दी महोत्सवानिमित्त शासनाकडून मिळालेल्या २५ कोटींपैकी आठ कोटी रुपयांची तरतूद रस्त्यांसाठी करण्यात आली होती. महात्मा गांधी, कस्तुरबा मार्ग यासारख्या प्रमुख रस्त्यांची कामे यात करण्यात आली. हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आली होती. त्यानंतर नगरोत्थानमधून वॉर्डावॉर्डातील रस्त्यांच्या बांधकामासाठी ५० कोटींची तरतूद करण्यात आली. ही कामे आता सुरू आहे. पुढे आणखी रस्त्यांच्या कामासाठी तरतूद करण्यात येणार आहे.
भू संपादन करणे गरजेचे
रस्त्यांचे रुंदीकरण करताना महापालिकेने रस्त्यावरील अतिक्रमण काढून रस्ते रुंद करण्याचा प्रयत्न करायला हवा. गरज पडत असेल तर पुढील दृष्टीकोन समोर ठेवून भू संपादन प्रक्रिया राबवून नागरिकांची काही जागाही रस्त्यांसाठी घेणे आवश्यक आहे. मात्र उगाच नागरिकांचा रोष नको म्हणून महानगरपालिका या भानगडीत पडलेच नाही.
अग्निशमन वाहनही जात नाही
चंद्रपूर शहरातील काही वॉर्डातील रस्ते एवढे निमुळते आहेत की त्यांना गल्ली म्हणून संबोधले तरी वावगे ठरणार आहे. रस्त्यावरून किमान अग्निशमन वाहन जावे, असा सर्वसमान्य संकेत आहे. मात्र शहरातील अनेक रस्त्यावरून अग्निशमन वाहनही जात नाही.
नागरिकही गप्पच
अनेक नागरिकांनी रस्त्यावर थोडे थोडे करून चांगलेच अतिक्रमण करून ठेवले आहे. त्यामुळे या नागरिकांना रस्ते तर रुंद हवेत; मात्र आपल्या घरांसमोर रस्ता रुंद नको, असेही काही नागरिक आहे. कारण एकतर अतिक्रमण काढले जाईल, नाहीतर भू संपादन प्रक्रियेत आपली जागा जाईल, अशी त्यांना भीती आहे. मात्र शहर विकासाच्या बाबतीत ही बाब योग्य नाही, हेही तेवढेच खरे.
याबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी महापालिकेचे आयुक्त सुधीर शंभरकर व नगर रचना विभागाचे सहाय्यक संचालक ए.एल. सिसोदिया यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

Web Title: Construction of roads on encroachment kurawal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.