अनागोंदी कारभारातूनच व्यापारी संकुलाचे बांधकाम
By Admin | Updated: March 16, 2015 00:45 IST2015-03-16T00:45:19+5:302015-03-16T00:45:19+5:30
शिवाजी चौकातील व्यापारी संकुल नगरपालिकेच्या अनागोंदी कारभारातूनच उभे झाले आहे.

अनागोंदी कारभारातूनच व्यापारी संकुलाचे बांधकाम
ब्रह्मपुरी : शिवाजी चौकातील व्यापारी संकुल नगरपालिकेच्या अनागोंदी कारभारातूनच उभे झाले आहे.
७ जून २००४ ला चंद्रशेखर आनंदराव डबली यांनी व्यापारी संकुलाचे नगरपालिकेकडून प्रारंभ प्रमाणपत्र घेतले. परंतु त्यांनी हे बांधकाम सुरू केले नाही. २४ जून २००६ ला हरिश मोटवानी यांनी बांधकाम मंजुरी घेतली. परंतु, तेव्हाही बांधकाम सुरू करण्यात आले नाही. बांधकाम परवानामध्ये बांधकामाची परवानगी मिळाल्यापासून एक वर्षाच्या आत बांधकाम सुरू करावे लागते अन्यथा ती परवानगी रद्द होते.
परंतु, त्यानंतर कुठलीही परवानगी न घेता बांधकाम सुरू झाले होते. नगर परिषदेत नगरसेवक निवडून जाण्यासाठी लाखो रुपये खर्च करून निवडून जातात व ते केवळ जनतेचा विकास करण्याच्या दृष्टीने नव्हे तर स्वत:च्या लेआऊटचा व व्यापारी संकुलची विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने जातात हे अशा अवैध व्यापारी संकुलाच्या बांधकामावरुन निष्पन्न होत आहे. शहरात या व्यापारी संकुलाव्यतिरिक्त अनेक व्यापारी संकुले याच प्रकाराची अनागोंदी कारभारातून उदयास आली आहेत.
१६ नोव्हेंबर २०१० ला पुन्हा बांधकामाची परवानगी घेण्यात आली. परंतु नगरपरिषदेच्या आवक-जावक बुकावर नोंद नाही. तेव्हाही ती परवानगी केवळ नगरसेवकाच्या ताकतीवर मिळविण्यात आली असली पाहिजे. व्यापारी संकुलाची तत्कालीन मुख्याधिकारी, अभियंता यांना पूर्ण माहिती असतानाही त्यांनी या प्रकाराच्या बांधकामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याचे नागरिकांचे मत आहे.
व्यापारी संकुलाचे बांधकाम २०१३ पासून सुरू करण्यात आले. एकूणच हे व्यापारी संकुल बांधकामाच्या परवानगीनुसार कुठेतरी संशयास्पद दिसून येत आहे. यामध्ये तत्कालीन मुख्याधिकारी, अभियंता व काही तत्कालीन नगरसेवकांचे हित लक्षात घेऊन अनागोंदी कारभाराने हे बांधकाम चिरीमिरीच्या व अमाप पैसा कमविण्याच्या दृष्टीने उदयास आले आहे. (तालुका प्रतिनिधी)