परझडीत शिक्षण, पाण्याची समस्या

By Admin | Updated: May 18, 2014 23:29 IST2014-05-18T23:29:33+5:302014-05-18T23:29:33+5:30

मारोडा येथून जवळच असलेल्या बफरझोनमधील परझडी गाव अनेक वर्षांपासून मूलभूत सोयींपासून वंचित आहे. गावाला जोडणारा रस्ता, प्राथमिक शाळा, पिण्याचे पाणी आणि

Constant education, water problem | परझडीत शिक्षण, पाण्याची समस्या

परझडीत शिक्षण, पाण्याची समस्या

 चंद्रपूर : मारोडा येथून जवळच असलेल्या बफरझोनमधील परझडी गाव अनेक वर्षांपासून मूलभूत सोयींपासून वंचित आहे. गावाला जोडणारा रस्ता, प्राथमिक शाळा, पिण्याचे पाणी आणि रोजगाराच्या संधीचा अभाव आहे. गावातील समस्या त्वरित दूर कराव्या, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मूल तालुक्यापासून मारोडा भाकणीवरुन परझडीकडे जाणारा मार्ग नेहमी चर्चेचा विषय आहे. या रस्त्याचा अद्यापपर्यंत विकास झाला नाही. चार किमीचा रस्ता पूर्णत: उखडला आहे. यापैकी एक किमी अंतर तर नलेश्वर नहराच्या कालव्यावरुन जावे लागते. त्याचे बांधकाम अत्यंत धिम्यागतीने सुरु आहे. त्यामुळे येथील नागरिक जंगलातून सोमनाथ प्रकल्पाकडे जाणार्‍या नलेश्वरच्या नहरानेच ये-जा करीत आहे. या रस्त्याचे बांधकाम पावसाळ्यापूर्वी करण्यात यावे, अशी मागणी आहे. या गावात ३० ते ३५ कुटुंबे वास्तव्याला आहेत. गावात पाण्याची टाकी बांधण्यात आली. याला चार ते पाच वर्षे झाले. नळाचे पाणी पिण्यासाठी मिळणार म्हणून नागरिकांनी खासगी नळाचे कनेक्शन जोडले. मात्र लाखो रुपये खर्च करुन बांधलेल्या या टाकीत पाणी कधीच पोहोचले नाही. गावात एक विहीर व एक बोअरवेल आहे. उन्हाळ्यात ही विहिर आटते. पावसाळ्यात बाहेरील झर्‍यामुळे अशुद्ध पाणी येते. सुक्ष्म जंतू पाण्यात आढळतात. त्यामुळे शुद्ध पाणी मिळत नाही. दुसरा पर्याय बोअरवेलचा आहे. ३० ते ३५ कुटुंबाना एकाचवेळी पाणी भरण्यास असुविधा होते. एकच बोअरवेल ते सुद्धा गावाच्या एका बाजूला असल्यामुळे एक घागर पाण्यासाठी अर्धा- अर्धा तास महिलांना ताटकळत उभे राहावे लागते. त्यामुळे महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बालकांना शिक्षणाचा मोफत व सक्तीचा अधिकार अधिनियम मंजूर झालेला आहे. एक किमतीपर्यंत येथे शाळा नाही. त्यामुळे अंगणवाडीनंतर किमान पूर्व प्राथमिक शिक्षणापासून येथील विद्यार्थी वंचित राहण्याची वेळ आली आहे. येथील काही विद्यार्थी नातेवाईकांकडे किंवा दूरच्या आश्रमशाळेत शिकायला जातात. काही विद्यार्थी मारोडा येथे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात शिकतात. त्यांची संख्या फार कमी आहे. प्राथमिक शिक्षणाची दुरवस्था थांबवायची असेल तर किमान वस्तीशाळा तरी शासनाने निर्माण करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. शेतात काम केल्याशिवाय गावातील नागरिकांना रोजगार मिळत नाही. कधी शहरातत लाकडाची मोळी विकून पोट भरणारी माणसं बफर झोनमुळे निर्बंधात आली आहेत. एप्रिल महिन्यात मोहफूले व मे महिन्यात तेंदुपत्याचा रोजगाराशिवाय येथील महिला-पुरुषांना उत्पन्नाचे साधन नाही. परझडीवासीयांच्या मूलभूत समस्या त्वरित सोडवून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. काही दिवसावर पावसाळा येऊन ठेपला आहे. पावसाळ्याच्या दिवसात गावात जाण्यासाठी रस्ता नाही. किमान रस्ता तयार करून दिलासा द्यावा,अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Constant education, water problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.