‘त्या’ रेल्वेगेटविरोधात काँग्रेस छेडणार तीव्र आंदोलन
By Admin | Updated: April 8, 2016 00:55 IST2016-04-08T00:55:39+5:302016-04-08T00:55:39+5:30
केवळ सिमेंट कंपन्याचे हट्ट पुरविण्यासाठी राजुरा शहरातील आसिफाबाद रोडवर रेल्वेगेट तयार केले आहे.

‘त्या’ रेल्वेगेटविरोधात काँग्रेस छेडणार तीव्र आंदोलन
अनेकदा गेट बंद : पाच हजार विद्यार्थ्यांचे जाणेयेणे प्रभावित
राजुरा : केवळ सिमेंट कंपन्याचे हट्ट पुरविण्यासाठी राजुरा शहरातील आसिफाबाद रोडवर रेल्वेगेट तयार केले आहे. मात्र या गेटमुळे पाच हजार विद्यार्थी वेठीस धरले जात आहे. या विरोधात राजुरा तालुका युवक काँग्रेसतर्फे आंदोलनाचा इशारा दिला आहे.
या रेल्वे गेटच्या पुढे दहा शाळा महाविद्यालय असून पाच हजार विद्यार्थी दररोज ये-जा करतात. नेमके परीक्षेच्या वेळेलाच गेट बंद असतो. सकाळपासून सायंकाळपर्यंत दहा ते पंधरा वेळा गेट बंद करण्यात येते. कधी गाडी अर्धा- अर्धा तास येत नाही. त्यामुळे विद्यार्थी व पालक ताटकळत बसतात. हा अत्यंत गंभीर प्रश्न असून दिवसा गाड्या चालऊ नका, चालवायच्या असले तर उड्डानपूल बांधा. करोडो रुपये नफा कमविणाऱ्या या सिमेंट कंपन्या शहरातील नागरिक व विद्यार्थ्यांना वेठीस धरत आहे. रेल्वेच्या मुजोरीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. राजुरा तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष गोलु ठाकरे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की या रेल्वेगेटमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बुधवारी सकाळी ९ वाजता गोंडवाना विद्यापीठाचा पेपर होता. नेमके ८.५० वाजता गेट बंद झाले. कोणतीच गाडी आली नाही. ९.१० वाजता गेट सुरु केले. गेटवरील नोकरी करणारे मुजोरी करीत असून हा प्रकार न थांबविल्यास पाच हजार विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावर उतरण्याचा इशारा युवक काँग्रेसचे अध्यक्ष गोलु ठाकरे यांनी दिला आहे. मागील अनेक वर्षापासून गेटचा प्रश्न प्रलंबित असून गेटजवळ मोठमोठे खड्डे पडले आहे. दोन महिन्यापूर्वी केलेल्या रस्त्याची दैनावस्था झाली आहे. हे रेल्वे गेट नागरिकांची डोकेदुखी ठरत असून १५ दिवसात उचित कार्यवाही न केल्यास सिमेंटच्या गाड्या जाऊ देणार नाही, असा इशारा दिला आहे. (शहर प्रतिनिधी)