काँग्रेसने दिला आंदोलन करण्याचा इशारा
By Admin | Updated: February 27, 2017 00:37 IST2017-02-27T00:37:45+5:302017-02-27T00:37:45+5:30
गाडेगाव-विरूर येथे वेकोलिच्या कामासाठी गडचांदूर उपविभागातून वीज प्रवाह वाहनू नेण्याचे कार्य सुरु आहे.

काँग्रेसने दिला आंदोलन करण्याचा इशारा
जीवितहानीची शक्यता : नांदाफाट्यात भर चौकातून ३३ के.व्ही. विद्युत केबल
कोरपना : गाडेगाव-विरूर येथे वेकोलिच्या कामासाठी गडचांदूर उपविभागातून वीज प्रवाह वाहनू नेण्याचे कार्य सुरु आहे. त्यासाठी नांदाफाटा येथील मुख्य चौकात तीन महिन्यांपूर्वी आवारपूरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला तीन फूट अंतरावर २ ते २.५ फूट खोल ३३ के.व्ही. क्षमतेचे विद्युत केबल टाकण्यात आले. इतक्या जवळून केबल टाकल्याने व जास्त खोली नसल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. भूमिगत केबल टाकण्यात यावे अन्यथा काम होऊ देणार नाही, असा इशारा काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे २२ फेब्रुवारी रोजी म.रा. विद्युत वितरण कंपनीला केबल टाकण्यासाठी परवानगी देण्यात आली. यापरवानगीत केबल १.६५ मीटर जमिनीच्या खाली टाकण्यात यावे, अशी अट टाकण्यात आली. परंतु कंत्राटदाराने परवानगी घेण्यापूर्वीच केबल रस्त्याच्या कडेला लागूनच तीन फुटाच्या अंतरावर फक्त २ ते २.५ फूट खोल आत टाकलेले आहे. हे काम नियमबाह्य असून त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. हे केबल काढून परवानगीनुसार १.६५ मीटर खोलीकरण करून रस्त्यापासून १० फूट दूर अंतरावर केबल टाकण्यात यावे, अशी मागणी कॉंग्रेसने निवेदनाद्वारे केली आहे.
सद्या अल्ट्राटेक प्रवेशद्वाराजवळ ३३ के.व्ही. लाईन ओवरहेड टाकण्यात येत आहे. हे ठिकाण वर्दळीचे असून उभे करण्यात येणारे खांब मुख्य रस्त्यावर येत आहेत. परिणामी मोठ-मोठ्या वाहनांच्या वर्दळीमुळे वाहन खांबाला आदळून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याठिकाणाहून भूमिगत केबल टाकण्यात यावे. लोकांच्या हितासाठी नियमानुसार काम न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा कॉंग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य शिवचंद्र काळे, युवक कॉंग्रेसचे विधानसभा अध्यक्ष आशिष देरकर, आवारपूरच्या सरपंच सिंधू परचाके, नांदा शहराध्यक्ष तथा ग्रा. पं. सदस्य अभय मुनोत, विलास राजगडकर, भीमराव आसनपल्लीवार, मो. हारून सिद्दिकी, सुमेंदर ठाकूर, रवी बंडीवार, अरविंद इंगोले आदींनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)