जीवती व कोरपन्यात काँग्रेसचा वरचष्मा
By Admin | Updated: January 12, 2016 00:50 IST2016-01-12T00:50:53+5:302016-01-12T00:50:53+5:30
जीवती, कोरपना व गोंडपिपरी नगरपंचायत निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला.

जीवती व कोरपन्यात काँग्रेसचा वरचष्मा
नगरपंचायत निवडणूक : गोंडपिपरीत बंडखोरांनी मारली बाजी
चंद्रपूर: जीवती, कोरपना व गोंडपिपरी नगरपंचायत निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. जीवती व कोरपन्यात कॉंग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले, तर गोंडपिपरीत सर्वाधिक १३ जागांवर अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली. केंद्रात व राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपाला या निवडणुकीत चांगलाच फटका बसला. सोमवारी सकाळी १० वाजतापासून कडक पोलीस बंदोबस्तात मतमोजणीला कोरपना नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी अतिशय चुरशीची निवडणूक झाली.
कोरपना येथे काँग्रेसचा विजयी जल्लोष
चंद्रपूर : कोरपना नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेसने सर्वाधिक म्हणजे १४ जागा बळकावल्या. येथे शेतकरी संघटनेचा एक, राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एक व एक अपक्ष उमेदवार निवडून आला. निवडणूक निकालानंतर विजय बावणे यांच्या नेतृत्वात विजयी रॅली काढून कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. कोरपना येथे काँग्रेसचे नंदा बावणे, उज्वला धारणकर, शेख फरीदा अंजूम ईस्माईल, संगीता पंधरे, कांताबाई भगत, अर्चना पारखी, सय्यद शम्मशाद परवीन उमर, रामदास पंधरे, ज्योत्स्रा खोबरकर, विजय तेलंग, रेखा चन्ने, मनोहर चन्ने, सय्यद मसुद अली तायर अली, राधिका मडावी हे निवडून आले. तसेच अपक्ष सय्यद सुहेल आबीद अली, राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक डोहे व अपक्ष सुभाष तुराणकर हे निवडून आले.
जीवती नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेसने १० जागांवर विजय मिळविला. येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चार, तर भाजपाचे तीन उमेदवार निवडणूक आले. गोंडपिंपरी नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत अपक्षांनी चमत्कार घडविला. अत्यंत चुरशीचा झालेल्या निवडणुकीत तब्बल सात उमेदवार निवडून आले, तर भाजपाला सहा, कॉंग्रेसला तीन तर शिवसेनेला एका जागेवर समाधान मानावे लागले
कोरपन्यात कॉंग्रेसच्या बावणे गटाचे वर्चस्व
सोमवारी जाहीर झालेल्या निकालाने भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शेतकरी संघटना या प्रमुख राजकीय पक्षांना आत्मचिंतन करण्यास भाग पाडले. कोरपना नगरपंचायतीची निवडणुकीत कॉंग्रेसने सर्व १७ जागांवर उमेदवार उभे केले होते. ही निवडणूक कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विजय बावणे यांच्या नेतृत्वात कॉंग्रेसचे माजी आमदार सुभाष धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली लढविण्यात आली. कॉंग्रेसला पराभूत करण्यासाठी अन्य विरोधी राजकीय पक्षांनी मोठी ताकद लावली. परंतु विरोधकांचे सारे प्रयत्न निष्फळ ठरले. निकालानंतर विजय बावणे यांच्या नेतृत्वात शहरातून विजयी मिरवणूक काढण्यात आली. कोरपना शहराचा विकास हेच आपले ध्येय असल्याचे यावेळी विजय बावणे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.