चार ग्रामपंचायतींवर काँग्रेसचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2015 00:55 IST2015-09-09T00:55:15+5:302015-09-09T00:55:15+5:30
तालुक्यात एकूण १७ ग्रामपंचायती आहेत. यातील १० ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका यावर्षी घेण्यात आल्या.

चार ग्रामपंचायतींवर काँग्रेसचे वर्चस्व
बल्लारपूर तालुका : भाजपाकडून दोन ग्रामपंचायती हिसकावल्या
बल्लारपूर : तालुक्यात एकूण १७ ग्रामपंचायती आहेत. यातील १० ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका यावर्षी घेण्यात आल्या. नांदगाव (पोडे), मानोरा व कोर्टीमक्ता येथील ग्रामपंचायतीची मुदत संपली. यामुळे येथे सोमवारी सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत नांदगाव (पोडे) व मनोरा ग्रामपंचायत काँग्रेसने हिसकावली तर कोर्टीमक्ता ग्रामपंचायतीवर आपला ताबा कायम ठेवला.
तालुक्यातील तीनही ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे सरपंच विजयी झाले. मंगळवारला हडस्ती येथे काँग्रेसचा सरपंच निवडून आले. नांदगाव (पोडे) येथे एकूण ११ सदस्य निवडून आले. येथील यंदाच्या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसचे गोविंदा पोडे यांच्या आघाडीने सर्वच जागा जिंकून इतिहास घडविला. सरपंच पदाचे आरक्षण अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी राखीव होते. त्यामुळे सरपंच पदासाठी प्रमोद देठे व उपसरपंच पदासाठी विद्यमान उपसरपंच मल्लेश कोडारी यांनी नामांकन दाखल केले. दोघेही अविरोध निवडून आले. येथे यापूर्वी भाजपच्या कल्पना निखाडे सरपंच होत्या.
मानोरा ग्रामपंचायतीवर भाजपाचे लहू टिकले आजतागायत सरपंच होते. यावर्षीच्या निवडणुकीत येथे एकूण ९ जागेपैकी ३ जागा राष्ट्रवादी काँग्रेस, तीन जागी भाजपाचे उमेदवार तर तीन जागेवर काँग्रेसच उमेदवार विजयी झाले. येथे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे मनोमिलन झाले. सरपंच पदाचे आरक्षण ओबीसी महिलासाठी होते. त्यामुळे सरपंच पदासाठी काँग्रेसच्या सविता धोडरे व भाजपाच्या मंगला पिपरे तर उपसरपंच पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे गजानन पिपरे व भाजपाचे बंडू पिपरे यांच्यात लढत झाली. यात काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी ६-३ असा भाजपाच्या उमेदवाराचा पराभव करुन विजय मिळविला. येथे सरपंच पदी सविता धोडरे तर उपसरपंचपदी गजानन पिपरे निवडून आले.
कोर्टीमक्ता ग्रामपंचायतीवर यापूर्वी काँग्रेसची सत्ता होती. दिलीप सोयाम यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने सोमवारी सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडीसाठी निवडणूक घेण्यात आली. येथील सातही जागा काँग्रेसच्या उमेदवारांनी जिंकल्याने सरपंच व उपसरपंच पदाची अविरोध निवडणूक घेण्यात आली. येथे सरपंच पदाचे आरक्षण सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव होते. त्यामुळे शंकुतला टोंगे यानची सरपंचपदी तर उपसरपंचपदी गोविंदा उपरे यांची निवड झाली. (शहर प्रतिनिधी)