नोटाबंदीच्या विरोधात काँग्रेसचा जनआक्रोश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2017 00:40 IST2017-01-07T00:40:03+5:302017-01-07T00:40:03+5:30

देशात लागू करण्यात आलेली नोटाबंदी आणि त्यामुळे निर्माण झालेली समस्या हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एककल्ली धोरणाचे फळ असल्याचा आरोप करीत ...

Congress resignation | नोटाबंदीच्या विरोधात काँग्रेसचा जनआक्रोश

नोटाबंदीच्या विरोधात काँग्रेसचा जनआक्रोश

मोर्चा, धरणे आणि घेराव : केंद्राच्या निर्णयाचा भाजीपाला वाटून निषेध
चंद्रपूर : देशात लागू करण्यात आलेली नोटाबंदी आणि त्यामुळे निर्माण झालेली समस्या हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एककल्ली धोरणाचे फळ असल्याचा आरोप करीत शुक्रवारी जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्र्त्यांनी जिल्ह्यात जनआक्रोश मांडला. हा आक्रोश प्रगट करण्यासाठी जनआक्रोश रॅली काढली, रस्त्यावर मोफत भाजीपाला वाटला आणि गांधी चौकात दिवसभर धरणा दिला. विशेष म्हणजे, मुद्दा एकच असला तरी हा जनआक्रोश काँग्रेसच्या नेत्यांनी तीन ठिकाणी मांडल्याने आवाज मात्र विखुरला.
माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात स्थानिक गांधी चौकात दिवसभर काँग्रेस कार्यकर्र्त्यांनी धरणा दिला. यात युवक काँग्रेस, काँग्रेस सेवादल पदाधिकारी, महिला काँग्रेसचे कार्यकर्ते, एनएसयुआय, युवक काँग्रेसचे कार्यकर्ते, विविध सेलचे पदाधिकारी उपस्थित होते. दिवसभर धरणा दिल्यावर एका शिष्ठमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन पाठविले. सायंकाळी ५ वाजता धरणा समाप्त झाला.
दुसरे आयोजन जिल्हा काँग्रेस कमेटीने स्थानिक संजय गांधी मार्केेटपासून केले होते. कार्यक्रमस्थळी मंडप घालून छोटेखानी सभा घेण्यात आली. यावेळी आमदार विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे निरीक्षक राठोड प्रामुख्याने उपस्थित होते.
आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात जनआक्रोश रॅली काढण्यात आली. यात अनेक शेतकरी आणि कार्यकर्ते हातात पंतप्रधान मोदी आणि केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध करणारे फलक घेऊन सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यलयावर पोहचल्यावर एका शिष्ठमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून सरकारच्या धोरणाचा निषेध व्यक्त केला. नोटाबंदीचा निर्णय जनतेसाठी आणि देशासाठी मारक असल्याने तो मागे घ्यावा, अशी मागणी निवेदनातून केली.
तिसरे आयोजन चंद्र्रपूर महानगर जिल्हा काँग्रेस कमेटीच्या वतीने करण्यात आले होते. नंदू नागरकर यांच्या नेतृत्वात स्थानिक गांधी चौकातून दुपारी दीड वाजता जनआक्रोश रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये शेतकरी बैलगाड्यांसह सहभागी झाले होते. गाड्यांध्ये अनेक प्रकारचा भाजीपाला घेऊन आलेल्या शेतकऱ्यांनी मार्गातील नागरिकांना मोफत वाटून मोदी सरकारचा प्रतिकात्मक निषेध नोंदविला. अनेकांनी या उपक्रमाला दाद दिली. रॅलीदरम्यान कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून सरकारचा निषेध नोंदविला. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पोहचल्यावर तिथे छोटेखानी सभा झाली. त्यातही नोटाबंदीच्या विषयावरून मोदी सरकारवर चौफेर हल्ला चढविण्यात आला. (जिल्हा प्रतिनिधी)

मोदींचा एककल्ली निर्णय देशासाठी घातक -पुगलिया
गांधी चौकातील धरणा कार्यक्रमादरम्यान माजी खासदार नरेश पुगलिया यांची पत्रकार परिषद झाली. ते म्हणाले, नोटाबंदीचा निर्णय कोणत्याही अर्थतज्ज्ञाचा सल्ला न घेता केलेला असून मोदी यांच्या या एककल्ली निर्णयामुळे देश आर्थिक संकटाकडे चालला आहे. देशासाठी आणि शेतकऱ्यांसाठी हा निर्णय घातक असल्याचा आरोप करून ते म्हणाले, ऐन हंगामाच्या काळात मोदींनी हा निर्णय घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. उत्पादित मालाला मातीमोल भाव आला. शेती चालविण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसा नसल्याने अनेकांना भविष्यात संकटाचा सामना करावा लागत आहे. देशातील काळा पैसा नष्ट करण्यासाठी मोदींनी हे पाऊल उचलेले असले तरी काय साध्य झाले, याचे उत्तर त्यांनी पक्षाचे नेते राहुल गांधी यांना द्यावे, असेही ते म्हणाले. भविष्यात असलेल्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका डोळयापुढे ठेवून या सरकारने भूमीपूजन करण्याचा आणि घोषणा करण्याचा सपाटा चालविल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

Web Title: Congress resignation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.