शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला घेरण्याची काँग्रेसची तयारी
By Admin | Updated: December 3, 2015 01:15 IST2015-12-03T01:15:47+5:302015-12-03T01:15:47+5:30
नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर घेरण्याची तयारी काँग्रेसने चालविली आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला घेरण्याची काँग्रेसची तयारी
दुसऱ्या आठवड्यात स्वतंत्र विदर्भावर चर्चा : विजय वडेट्टीवार यांची माहिती
चंद्रपूर : नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर घेरण्याची तयारी काँग्रेसने चालविली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार ठोस भूमिका जाहीर करणार नाही तोपर्यंर कामकाज चालवू न देण्याची रणनिती विदर्भातील काँग्रेसच्या आमदारांनी आखली आहे.
विदर्भातील दुष्काळ, शेतकरी आत्महत्या, वीज दरवाढ, शेतकऱ्यांच्या योजनांना सरकारने लावलेली कात्री आदी विषयांवर अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच सरकारला खिंडीत गाठण्यासाठी काँग्रेसच्या आमदारांची व्यूहरचना सुरु आहे. विधान सभेतील काँग्रेसचे उपनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपुरातील एका पत्रकार परिषदेत मंगळवारी ही माहिती दिली. ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वळविण्याचा प्रयत्न काँग्रेसने वारंवार केला असला तरी हे सरकार म्हणावे तसे संवेदनशिल नाही. काँग्रेसच्या काळात शेतकऱ्यांना साडेचार हजार कोटींची दुष्काळी मदत २०१२-१३, १३-१४ मध्ये देण्यात आली होती.
राज्यातील विद्यामान सरकारने अलिकडे केवळ बाराशे कोटी रूपयांची मदत केली असली तरी आजवर सर्वाधिक मदत दिल्याचा कांगावा या सरकारकडून केला जात आहे. राज्यातील १६ हजार गावे दुष्काळाच्या यादीत असली तरी अद्यापही चार हजार गावे या मदतीपासून वंचित आहेत. व्यापाऱ्यांनी धानाचे भाव पाडले आहेत. पावसाअभावी विदर्भातील शेतकरी कफल्लक झाले आहेत. वेगळ्या विदर्भाचे आश्वासन या सरकारने निवडणुकीपूर्वी दिले होते. मात्र त्यावर आता हे सरकार बोलायलाही तयार नाही.
विदर्भातील शेतकऱ्यांची विपन्नावस्था सुरु असूनही सरकारने धान खरेदी केंद्र उशिराने सुरु केल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. ते म्हणाले, सिंचनाचे तीन हजार कोटी रूपये अखर्चित असूनही पूर्व विदर्भातील एकाही सिंचन प्रकल्पाला या सरकारने मान्यता दिलेली नाही. नव्याने दिलेल्या निधीत पूर्व विदर्भाला सिंचनासाठी नव्याने छदामही प्रस्तावित केली नाही. राज्य सरकार अधिवेशनासाठी येत असलेल्या नागपुरातील कायदा व सुव्यवस्था ढासळल्याचा आरोपही आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला. एलबीटी आणि टोल नाके बंद केल्यामुळे सरकारच्या तिजोरीवर सहा कोटी रूपयांची तुट येणार आहे. ती भरून काढण्यासाठी सरकाने नवी उपाययोजना करण्याऐवजी करवाढ सुरू केली आहे. सर्वसामान्यांच्या योजनांना कात्रीे लावून हे सरकार पैसा वाचवू पहात आहे. अंगणवाडी कर्मचारी, शिक्षक, कोतवालांचे चार महिन्यांपासून वेतन नाही. दारूबंदीची अवस्था वाईट असून अंमलबजावणी फसवी ठरली आहे. सरकारनेआधी तीन जिल्ह्यात दारूबंदी यशस्वी करून दाखवावी, असेही आव्हान त्यांनी यावेळी सरकारला दिले. (जिल्हा प्रतिनिधी)
पर्यटनाला येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना शेताच्या बांध्यावर जायला वेळ नाही
चंद्रपूर जिल्ह्यात मुुख्यमंत्री दोन वेळा आले. पहिला दौरा दिवाळीसाठी आणि दुसरा ताडोबा पर्यटन केंद्रातील एका रिसॉर्टच्या उद्घाटनासाठी झाला. मुख्यमंत्र्यांना पर्यटनासाठी आणि रिसॉर्टच्या उद्घाटनासाठी दुसऱ्या दौऱ्यात वेळ मिळाला मात्र शेतकऱ्यांच्या बांध्यावर जाऊन शेतीची पहाणी करण्यासाठी त्यांना वेळ मिळाला नाही, अशी बोचरी टीका काँग्रेसचे उप गटनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. ते म्हणाले, या जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळामुळे गाव सोडून कामाच्या शोधात निघाला आहे. किमान हे चित्र त्यांनी समजून घ्यावे.
वेगळ्या विदर्भाचा ठराव दुसऱ्या आठवड्यात
काँग्रेसने वेगळ्या विदर्भासाठी अशासकीय ठराव मांडला असून हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात तो चर्चेला येणार असल्याची माहिती आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अशासकीय ठराव ६९ व्या क्रमांकाचा असून चिठ्ठीनुसार तो आता पाचव्या क्रमावर आला आहे. त्यामुळे या ठरावावर चर्चा होणे अपेक्षित असल्याचे ते म्हणाले. विदर्भातील समस्या आणि संपन्नता लक्षात घेता सरकारने हा ठराव पारित करावा, अशी मागणी काँग्रेसकडून केली जाणार आहे.