चंद्रपुरात काँग्रेस तर भंडारामध्ये भाजपचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2022 20:28 IST2022-02-17T20:27:18+5:302022-02-17T20:28:33+5:30
Chandrapur News चंद्रपुरातील सहा आणि भंडारा जिल्ह्यातील तीन नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी आज, गुरुवारी निवडणूक झाली. नऊपैकी सर्वाधिक ४ नगरपंचायतच्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या उमेदवाराची वर्णी लागली.

चंद्रपुरात काँग्रेस तर भंडारामध्ये भाजपचे वर्चस्व
चंद्रपूर/भंडारा : चंद्रपुरातील सहा आणि भंडारा जिल्ह्यातील तीन नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी आज, गुरुवारी निवडणूक झाली. नऊपैकी सर्वाधिक ४ नगरपंचायतच्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या उमेदवाराची वर्णी लागली. विशेष म्हणजे, हे चारही नगराध्यक्ष चंद्रपूर जिल्ह्यातीलच आहे. दाेन जिल्ह्यात काॅंग्रेसचे ५ उपाध्यक्ष निवडून आले. भंडारा जिल्ह्यातील तीनपैकी दाेन नगरपंचायतीवर भाजपने वर्चस्व मिळविले. परंतु उपाध्यक्षपदावर भाजपने ऐनवेळी अपक्ष उमेदवाराला समर्थन दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या.
चंद्रपूर जिल्ह्यातील पाेंभुर्णा, सावली, जिवती, गाेंडपिंपरी, सिंदेवाही, काेरपना या नगरपंचायतीसाेबतच भंडारा जिल्ह्यातील माेहाडी, लाखांदूर, लाखनी नगरपंचायतीच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदासाठी गुरुवारी निवडणूक झाली. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील सावली, गाेंडपिंपरी, सिंदेवाही आणि काेरपना नगरपंचायतच्या अध्यक्षपदी काॅंग्रेस उमेदवार निवडून आला. पाेंभुर्णा भाजपकडे तर जिवती राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली. यासाेबतच सावली, जिवती, सिंदेवाही आणि काेरपना या नगरपंचायतच्या उपाध्यक्षपदी काॅंग्रेस उमेदवार तर पाेंभुर्णाच्या उपाध्यक्षपदी भाजप आणि गाेंडपिंपरीच्या उपाध्यक्षपदी शिवसेना उमेदवाराची वर्णी लागली.