स्वीकृत सदस्य निवडीवरुन गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2017 00:30 IST2017-06-18T00:30:02+5:302017-06-18T00:30:02+5:30
येथील नगर पालिकेच्या उपाध्यक्षपदी भाजपचे गणेश तर्वेकर यांची दहाविरुद्ध आठ अशी निवड करण्यात आली.

स्वीकृत सदस्य निवडीवरुन गोंधळ
नागभीड न.प.च्या उपाध्यक्षपदी गणेश तर्वेकर : भाजप कार्यकर्त्यांचा पोलीस ठाण्यात तर काँग्रेसचा सीओंच्या कक्षात ठिय्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : येथील नगर पालिकेच्या उपाध्यक्षपदी भाजपचे गणेश तर्वेकर यांची दहाविरुद्ध आठ अशी निवड करण्यात आली. मात्र स्वीकृत सदस्य निवडीवरुन निर्माण झालेला गोंधळ शनिवारी दिवसभर नागभीडकरांच्या चर्चेचा विषय ठरला.
काँग्रेस नगरसेवकांची तक्रार करण्यासाठी भाजप नगरसेवकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या दिला, तर नगराध्यक्षांनी स्वीकृत सदस्यांची अवैध निवड केली, असा आरोप करून काँग्रेस नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांसमोर ठिय्या ठोकून कागदपत्रांची मागणी केली. त्यामुळे चांगलाच गोंधळ उडाला होता. येथील न.प.च्या उपाध्यक्ष आणि स्वीकृत सदस्य यांची शनिवारी निवड करण्यात येणार होती. त्यानुसार विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष प्रा. डॉ. उमाजी हिरे होते.
विषयसूचीनुसार अगोदर उपाध्यक्षपदाची निवड करण्यात आली. या पदासाठी भाजपकडून गणेश तर्वेकर तर काँग्रेसकडून संजय अमृतकर यांची नामांकने आल्याने भाजपच्या तर्वेकर यांनी काँग्रेसच्या अमृतकर यांचा १० विरुद्ध ८ अशा मतांनी पराभव केला.
यानंतर स्वीकृत सदस्य निवडीचा विषय समोर आला. यासाठी भाजपकडून नरेंद्र हेमणे व विलास श्रीरामे, तर काँग्रेसकडून प्रतीक भसीन यांची नावे निर्देशित करण्यात आली. नगराध्यक्ष प्रा. हिरे यांनी स्वीकृत सदस्यांची नावे जाहीर करताना हेमणे व श्रीरामे यांची नावे जाहीर केली. यावर काँग्रेस नगरसेवकांनी आक्षेप घेवून सभागृहात रोष व्यक्त केला. नियमानुसार एक सदस्य आमचा घ्या, अशी काँग्रेसची मागणी होती. यानंतर भाजपचे संपूर्ण नगरसेवक कार्यकर्त्यांसह पोलीस ठाण्यात दाखल झाले.
काँग्रेस नगरसेवकांवर गुन्हा दाखल करा, अशी त्यांची मागणी होती. पण वृत्त लिहिस्तोवर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. तर काँग्रेस नगरसेवकांनी मुख्याधिकारी यांच्या कक्षात जाऊन कागदपत्रांची मागणी केली. पण यावेळी त्यांनीही असमर्थता दर्शविली. त्यामुळे येथेही चांगलाच गोंधळ उडाला.
दरम्यान प्रस्तुत प्रतिनिधीने नगराध्यक्षांना विचारणा केली असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तर मुख्याधिकारी मेघना वासनकर यांनीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. शनिवारी स्वीकृत सदस्य निवडीवरून पालिकेत रंगलेल्या राजकीय आखाड्याची शहरात चांगलीच चर्चा रंगली होती. आता सर्व पदाधिकाऱ्यांची निवड झाली असून शहर विकासाची आशा नागभीडवासीयांना लागून आहे.