जलाशयाची स्थिती चिंताजनक
By Admin | Updated: February 21, 2015 00:58 IST2015-02-21T00:58:32+5:302015-02-21T00:58:32+5:30
उन्हाची तीव्रता फेब्रुवारी महिन्यातच जाणवायला लागली आहे. यंदा वरूणराजानेही

जलाशयाची स्थिती चिंताजनक
रवी जवळे ल्ल चंद्रपूर
उन्हाची तीव्रता फेब्रुवारी महिन्यातच जाणवायला लागली आहे. यंदा वरूणराजानेही जिल्ह्यावर अवकृपा दाखविली. त्यामुळे जलसाठ्यात मुबलक पाणी जमा होऊ शकले नाही. सद्यस्थितीत इरई धरण सोडले तर जिल्ह्यातील सर्व जलाशये चिंताजनक स्थितीत आहे. चंदई, लभानसराड आणि दिना प्रकल्प कोरडे पडले आहे. त्यामुळे यंदा जिल्ह्यात भिषण पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण होणार आहे. असे असले तरी प्रशासन मात्र याबाबत अद्यापही गंभीर असल्याचे दिसत नाही.
२०१३ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात सरासरी ओलांडत पाऊस बरसला. एवढा की तब्बल चार वेळा पूरपरिस्थिती निर्माण झाली. सर्वत्र हाहा:कार उडाला होता. शेतकऱ्यांसह नागरिकांचेही अतोनात नुकसान झाले होते. मात्र २०१४ मध्ये वरूणराजाने दडी मारली. मृग नक्षत्राच्या प्रारंभीच पावसाने हुलकावणी दिली होती. त्यामुळे शेतकरी चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत होते. त्यानंतर पाऊस आला. मात्र तो अत्यल्पच. त्यामुळे शेतकऱ्यांचे पेरलेले बि-बियाणे नष्ट झाले. शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. त्यानंतर सातत्याने पावसाची हुलकावणी सुरूच राहिली. काही शेतकऱ्यांना तर तिसऱ्यांदा पेरण्या कराव्या लागल्या होत्या. वरूणराजाच्या अशा प्रकोपामुळे जमिनीत पाहिजे त्या प्रमाणात पाणी मुरू शकले नाही. परिणामी पाण्याची पातळी झपाट्याने पावसाळ्यातही वाढू शकली नाही.
जिल्ह्यात असोलामेंढा, घोडाझरी, नलेश्वर, चंदई, चारगाव, अंमलनाला, लभानसराड, पकडीगुड्डम, डोंगरगाव, इरई व दिना हे सिंचन प्रकल्प आहेत. मात्र या पावसाळ्यात यातील काही प्रकल्पच तुडुंब भरू शकले. उर्वरित जलाशये पावसाळ्यातच काही प्रमाणात रिकामेच होते. त्यामुळे २०१५ मधील उन्हाळ्यात पाणी प्रश्न पेटणार, हे तेव्हाच दिसून येत होते. तरीही जिल्हा प्रशासनाने या पाण्याचे नियोजन गंभीरतेने केले नाही. पकडीगुड्डम, डोंगरगाव व अंमलनाला सिंचन प्रकल्पाचे पाणी मोठ्या प्रमाणात उद्योगांकडूनही घेतले जाते. त्यांना जिल्हा प्रशासनाने वेळीच थांबविणे गरजेचे होते. मात्र तसे करण्यात आले नाही. त्यामुळे प्रकल्पाचे पाणी झपाट्याने कमी होत राहिले. आता फेब्रुवारी महिन्याचा पंधरवाडा लोटला आहे. आताच जिल्ह्यातील जलाशये कोरडी पडण्याच्या मार्गावर आहे. चंदई, लभानसराड, दिना हे प्रकल्प ‘ड्राय’ झाले आहेत. घोडाझरी, नलेश्वर सिंचन प्रकल्पात तीन टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे हे दोन्ही प्रकल्प काही दिवसात ‘ड्राय’ होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, एकाही प्रकल्पात ३० टक्क्यापेक्षा अधिक जलसाठा नाही. त्यामुळे येणारा उन्हाळा जिल्ह्यावर पाणी टंचाईचे सावट घेऊन येणार आहे, हे निश्चित.
चंद्रपूरकरांना तुर्तास चिंता नाही
४जिल्ह्यातील इतर जलाशयाच्या तुलनेत इरई धरणाची स्थिती चांगली आहे. या धरणाची क्षमता १४२.०९ द.ल.घ.मी. आहे. सध्या या धरणात ११२.३४८ द.ल.घ.मी. जलसाठा आहे. म्हणजेच ७०.११ टक्के पाणी अजूनही या धरणात आहे. याच धरणातून चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे सध्यातरी चंद्रपूरकरांना पाणी टंचाईची चिंता नाही.
नदी-नाल्यांचीही पातळी खालावली
४ग्रामीण भागात नदी, मोठे नाले हेच पाण्याचे स्रोत आहेत. जिल्ह्यातील इरई, उमा, झरपट यासारख्या लहान नद्यांमधील पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील बोअरवेल, विहिरींचीही पातळी खोलात गेली आहे. परिणामी पुढे ग्रामीण भागात पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे.
सूर्याचा पाराही वाढू लागला
४फेब्रुवारी महिन्याचा पंधरवाडा लोटला आहे. आता गुलाबी थंडी जाऊन उन्हाची तीव्रता जाणऊ लागली आहे. सुर्याचा पाराही ३७ अंशापर्यंत गेला आहे. मार्च महिन्यात सुर्य आग ओकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास पाण्याची पातळी आणखी खोल जाण्याची शक्यता आहे.
प्रकल्पाचे नावजलसाठ्याची टक्केवारी
आसोलामेंढा ९.० %
घोडाझरी ३.०८ %
नलेश्वर ३.२१ %
चंदई शून्य %
चारगाव १३.९६ %
अमलनाला २१.२० %
लभानसराड शून्य
पकडीगुड्डम २८.४८ %
डोंगरगाव २५.८८ %
दिना शून्य
इरई ७०.११ %