वैद्यकीय अधिकाऱ्याअभावी जिवतीत रुग्णांचे हाल
By Admin | Updated: August 13, 2016 00:37 IST2016-08-13T00:37:31+5:302016-08-13T00:37:31+5:30
संपूर्ण तालुक्यात व्हायरल फ्लूने थैमान घातले आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना मलेरिया, अतिसार यासारखे अनेक रोगांची लागण होत आहे.

वैद्यकीय अधिकाऱ्याअभावी जिवतीत रुग्णांचे हाल
जिवती आरोग्य केंद्र : डॉक्टराची दोन पदे रिक्त
संघरक्षित तावाडे जिवती
संपूर्ण तालुक्यात व्हायरल फ्लूने थैमान घातले आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना मलेरिया, अतिसार यासारखे अनेक रोगांची लागण होत आहे. त्यामुळे जिवती प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. मात्र या दवाखान्यात स्थायी डॉक्टरच नसल्याने अंगणवाडी तपासणी करणारे डॉक्टर भुषण मोरे हे रुग्णांवर उपचार करत आहे. परिणामी तालुक्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे.
जिवती हे तालुक्याचे ठिकाण आहे. मात्र याठिकाणी ग्रामीण रुग्णालय नाही. येथे प्राथमिक केंद्र आहे. मात्र या केंद्रात अनेक दिवसांपासून डॉक्टरांचे दोन पदे रिक्त आहेत. सद्या येथे एक महिला डॉक्टर केंद्राचा प्रभार सांभाळत आहे. रुग्णांची गर्दी दररोज वाढत असल्याने स्थायी डॉक्टरांची मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.
सदर प्रतिनिधीने दवाखान्यात भेट दिली असता, अनेक रुग्ण उपचाराच्या प्रतीक्षेत बघायला मिळाले. या आरोग्य केंद्रात डॉक्टरांची दोन पदे रिक्त आहेत. एकच महिला डॉक्टर रुग्णांवर उपचार करतात. त्या वेळेवर उपस्थित नसल्या तर मी स्वत: रुग्णांवर उपचार करतो. अशी प्रतिक्रिया अंगणवाडी तपासणीचे डॉक्टर मोरे यांनी दिली. संपूर्ण तालुक्यात मलेरिया, टायफाईड, हगवण यासारखे आजार बहूतांश प्रमाणात दिसून येत आहेत. मात्र या आजारावर निदान करणारा औषधसाठाही केंद्रात उपलब्ध नाही. बहूतेक अतिसाराच्या रुग्णांना सलाईनची लावणे गरजेचे असते. मात्र तेसुद्धा उपलब्ध नाही. त्याचप्रमाणे गोळ्या, मलम, खोकल्याचे औषध, ओ.आर.एस पावडर उपलब्ध नाही. अशी माहिती डॉ. भुषण मोरे यांनी दिलीे.
अंगणवाडी तपासणीचे डॉक्टर करतात स्थायी डॉक्टरचे काम
प्रतिनिधीने प्रत्यक्ष दवाखान्याला भेट दिली असता, अंगणवाडी तपासणी करणारे डॉक्टर हे रुग्णांची तपासणी करुन उपचार करत होते. त्यांच्याशी संवाद साधला असता तालुक्याचा दवाखाना असून येथे स्थायी डॉक्टर नाहीत. त्यांची पदे रिक्त आहेत. पण याठिकाणी येणाऱ्या रुग्णांवर उपचार केला नाही तर त्यांच्याकडे दुर्लक्ष होणार म्हणून मला माझे अंगणवाडी तपासणीचे काम सोडून याठिकाणी उपचार करावे लागत आहे असे डॉ. भुषण मोरे यांनी सांगीतले.