गोसीखुर्द कालव्याच्या बांधकामात मातीवरच काँक्रीट
By Admin | Updated: January 11, 2015 22:49 IST2015-01-11T22:49:52+5:302015-01-11T22:49:52+5:30
नवरगाव-रत्नापूर मार्गावरून गेलेल्या गोसीखुर्दच्या उजव्या कालव्याचा उपकालवा याचे सिमेंटीकरण सुरू असून केवळ मातीवर सिमेंटीकरण सुरू असल्याने त्याची गुणवत्ता घसरली आहे.

गोसीखुर्द कालव्याच्या बांधकामात मातीवरच काँक्रीट
नवरगाव : नवरगाव-रत्नापूर मार्गावरून गेलेल्या गोसीखुर्दच्या उजव्या कालव्याचा उपकालवा याचे सिमेंटीकरण सुरू असून केवळ मातीवर सिमेंटीकरण सुरू असल्याने त्याची गुणवत्ता घसरली आहे.
मागील चार पाच वर्षांपासून सदर उपकालव्याचे काम सुरू आहे. यावर्षी नवरगाव-रत्नापूर रस्त्यालगतच्या कालव्याचे सिमेंटीकरण सुरू आहे. परंतु दोन्ही बाजुची माती सपाट करून त्यावर काँक्रीट टाकल्या जात आहे. अडीच ते तीन इंच थरांचा काँक्रीट टाकल्या जात असून सळाखीचा उपयोग नाही. तसेच माती सपाट केल्याने काही दिवसातच आतील माती दबणार असून केवळ काँक्रीटचा पोपडा तेवढा वर राहील. मात्र या कालव्याचे पाणी यायला सुरुवात होईल, तेव्हा काँक्रीटचे थरसुद्धा पाण्याबरोबर वाहून जातील.
शासनाने व राजकीय नेत्यांनी परिसरातील शेतकऱ्यांना पाणी मिळणार, येथील जमीन सुजलाम्-सुफलाम् होईल, अशी भाबडी आशा दाखविली आहे. परंतु जेव्हा-केव्हा पाणी या कालव्यातून यायला सुरुवात होईल, तेव्हा मात्र विविध ठिकाणी अशा कामामुळे भगदाड पडून कालवा फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी शेतकऱ्यांचे स्वप्न अधुरेच राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर कालव्याचे काम मागील दोन-तीन महिन्यांपासून सुरू असून कालव्याच्या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत कुणीही बोलायला तयार नाहीत. मातीवर सिमेंट काँक्रीट कधीच पकड घेत नाही. मग तो कालवा मजबूत कसा होणार? असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे. (वार्ताहर)