चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ कार्यालय चंद्रपूर तथा जिल्हा नियोजन कार्यालय चंद्रपूर यांच्याकडून प्राप्त झालेल्या निधीमधून सांसद आदर्श गाव योजनेअंतर्गत केंद्रीय रसायन राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी निवड केलेल्या चंदनखेडा येथे १० दिवसीय मधमाशा पालन उद्योगाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणाचा नुकताच समारोप झाला.या प्रशिक्षणामध्ये ३० शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. मधमाशा पालन उद्योग प्रशिक्षण सत्राचा समारोप व प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदर्श ग्राम राज्यस्तरीय समितीचे सदस्य नरेंद्र जीवतोडे होते. केंद्रीय रसायन राज्यमंत्री यांचे स्वीय सहाय्यक राहुल बनकर, रवी नागापूरे, गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष गायत्री बागेश्वर तसेच नागोराव ठावरी, सोनकुसरे, विठ्ठल हनवते, नरेंद्र भोयर, डेव्हीड बागेश्वर, एन. टी. सोनकुसरे व ग्रामोदय संघाचे प्राचार्य जितेंद्र कुमार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.मधमाशा पालन उद्योग शेतीला उत्तम जोडधंदा असून कमी भांडवलात मधमाशा पालन उद्योग करता येतो. मधमाशापासून शेत पिकांचे, फुलाचे परागीकरण होऊन उत्पादनात ३० ते ३५ टक्के वाढ होते. कुटुंबातील कोणताही व्यक्ती हा उद्योग करु शकतो. मध उद्योगाचे प्रशिक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांनी मधपेट्या प्राप्त झाल्यानंतर मध उद्योगाचे काम सुरू करावे व आपली आर्थिक उन्नती करावी, असे आवाहन नरेंद्र जीवतोडे यांनी केले.१० दिवसांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात मधुक्षेत्रीक बगाडे यांनी मधमाशांची ओळख, वसाहती कशा पकडाव्या, मधपेट्याच्या संपूर्ण भागाची ओळख, मधमाशी पालनापासून होणारे फायदे, मधपोळ्यापासून होणारे फायदे व मधपेट्यातून मध काढण्याचे प्रात्यक्षिक करुन वाढ कशा प्रकारे होते, याबाबत संपूर्ण माहिती दिली. बाहेरील तज्ज्ञ मंडळीनीसुद्धा मार्गदर्शन केले. यामुळे प्रशिक्षणार्थ्यांमध्ये मधमाशा पालन उद्योग संबंधी आवड निर्माण होवून उद्योग करण्यास इतर शेतकरीसुद्धा पुढे येत आहेत.कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रपूर जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी सी.बी. कोहाडे यांनी केले. संचालन ज्येष्ठ पर्यवेक्षक आर. डी. साखरे यांनी केले व आभार मधुक्षेत्रीक बगाडे यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)
मधमाशा पालन उद्योग प्रशिक्षण सत्राचा समारोप
By admin | Updated: October 30, 2015 01:13 IST