आर्थिक कोंडीत शेतकऱ्यांना मजुरांची चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:28 IST2021-07-29T04:28:52+5:302021-07-29T04:28:52+5:30
चंद्रपूर : मागील वर्षापासून कोरोना संकटामुळे प्रत्येक जण संकटात आहे. असे असतानाच ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना शेतीकामासाठी निंदणी तसेच ...

आर्थिक कोंडीत शेतकऱ्यांना मजुरांची चिंता
चंद्रपूर : मागील वर्षापासून कोरोना संकटामुळे प्रत्येक जण संकटात आहे. असे असतानाच ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना शेतीकामासाठी निंदणी तसेच खत देण्यासाठी मजुरांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे आर्थिक कोंडीत सध्या शेतकरी सापडले असून नुकसान करण्यापेक्षा अतिरिक्त मजुरी देऊन शेतकरी मोकळे होत आहेत. यासाठी पैशाची जुळवाजुळव करीत आहेत.
दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. त्या तुलनेत शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे सध्या शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. मागील काही दिवसात मजुरांची मजुरी वाढल्यामुळे शेतकरी शेती सोडून अन्य कामाकडे वळत आहेत.
बियाणे, खते, कीटकनाशकाच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाढीव भावाने बियाणे व खते शेतकरी खरेदी करीत आहेत. शेतकऱ्यांना निर्धारित वेळेतच पिकांची मशागत करावी लागते. अन्यथा त्याचा काहीही उपयोग होत नाही. परिणामी पीक अत्यल्प येते. याकरिता शेतकरी डवरणी, फवारणी निंदा काढणे, पिकांची कापणी व मळणी करणे, रोवणी करणे, बाजारापर्यंत माल विक्री करताना त्यांना मजुरांची नितांत गरज पडते; मात्र मजुरी जास्त असल्यामुळे काय करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
बहुतांश गावात पुरुष व स्त्री मजूर गावात मिळेनासे झाले आहे. त्यामुळे शहरातील मजूर नेण्याकडे त्यांचा कल आहे. मात्र यासाठी वाहनाचा खर्चही शेतकऱ्यांना करावा लागत आहे. पीक वाया जाण्यापेक्षा खर्च केलेला बरा म्हणून शेतकरी अतिरिक्त खर्च करीत आहेत. त्यामुळे शासनाने बी-बियाणे, खतांचे भाव कमी करून दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
बाॅक्स
कपाशीचा खर्च परवडेना
धान उत्पादक जिल्हा अशी चंद्रपूर जिल्ह्याची ओळख आहे; मात्र जिल्ह्यात कापूस, सोयाबीन हे पीक सुद्धा मोठ्या प्रमाणात घेतले जाते. राजुरा, कोरपना, वरोरा, भद्रावती या तालुक्यात कापूस उत्पादन घेतले जाते; मात्र कापूस उत्पादनासाठी खूप खर्च येतो. त्यातच मजुरी परवडत नसल्याने काय करावे, या विवंचनेत शेतकरी पडले आहे.