अन्न सुरक्षेच्या लाभार्थ्यांची चिंता मिटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:30 IST2021-04-23T04:30:55+5:302021-04-23T04:30:55+5:30
चंद्रपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षभरापासून जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून कोरोना संसर्गाने तोंड वर काढले ...

अन्न सुरक्षेच्या लाभार्थ्यांची चिंता मिटली
चंद्रपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षभरापासून जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून कोरोना संसर्गाने तोंड वर काढले आहे. परिणामी राज्य सरकारने प्रथम संचारबंदी त्यानंतर आता लाॅकडाऊनची घोषणा केली आहे. मात्र, यामध्ये गरीब तसेच गरजूंची उपासमार होऊ नये यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील पात्र लाभार्थ्यांना एप्रिल महिन्यामध्ये मोफत धान्य देण्याची घोषणा केली. मात्र, काही लाभार्थ्यांनी एप्रिल महिन्यातील धान्य पैसे देऊन उचलल्यामुळे या लाभार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र, अशा लाभार्थ्यांना पुढील म्हणजेच मे महिन्यामध्येही मोफत धान्याचा लाभ घेता येणार आहे. यासंदर्भात शासनाने तसे निर्देश दिले आहे.
मागील काही दिवसांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. जिल्ह्यात वर्षभरामध्ये ४७ हजार ९८३ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. सद्य:स्थितीत १३ हजार ६० रुग्ण ॲक्टिव्ह आहे. अनेक रुग्णांना बेडसुद्धा मिळत नसल्याची स्थिती आहे अशीच स्थिती राज्यभरात आहे. त्यामुळे राज्य सरकारने प्रथम संचारबंदी लागू केली. मात्र, रुग्णसंख्या कमी होत नसल्याने आता लाॅकडाऊन लागू केला आहे. दरम्यान, गरीब कुटुंबातील व्यक्तींची वाताहात होऊ नये, त्यांना दिलासा मिळाला यासाठी अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांना प्रतिकार्ड ३५ किलो गहू तसेच तांदूळ तर प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना प्रति लाभार्थी ५ किलो गहू, तांदूळ एक महिन्यासाठी मोफत देण्याची देण्याची घोषणा केली. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात होते. मात्र, काही लाभार्थ्यांनी चालू महिन्यामध्ये स्वस्त धान्य दुकानांतून पैसे देऊन धान्य विकत घेतल्यामुळे आपल्याला लाभ मिळणार नाही, अशी शंका उपस्थित केली जात होती. मात्र, पुरवठा विभागाने नवा आदेश काढून अशा लाभार्थ्यांना पुढील महिन्यामध्ये धान्याचा लाभ देण्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे, या महिन्यामध्ये लाभार्थ्यांनी धान्य उचलले नसेल तरीही पुढील महिन्यात एप्रिलचे धान्य मोफत तसेच पुढील महिन्याचे धान्य पैसे देऊन घ्यावे लागणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे लाभार्थ्यांना थोडाफार का होईना दिलासा मिळाला आहे.
बाॅक्स
जिल्ह्यातील अंत्योदय लाभार्थी
१,३७१८७
प्राधान्य कुटुंब
२,६१,०८४
कोट
राज्य शासनाने अन्न सुरक्षा योजनेतील पात्र लाभार्थ्यांना एप्रिल महिन्यातील धान्य मोफत देण्याची घोषणा केली आहे. मात्र, काही लाभार्थ्यांनी या महिन्यामध्ये पैसे देऊन धान्य उचलले आहे. त्यामुळे अशा लाभार्थ्यांना पुढील महिन्यात मोफत धान्य मिळणार आहे तर ज्यांनी एप्रिल महिन्यातील धान्य उचलले नाही. अशाही लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे.
-भारत तुंबडे
अन्न पुरवठा निरीक्षण अधिकारी, चंद्रपूर