जडवाहनांवर कारवाई करण्याची मागणी
माजरी : कोळसा, राख, रेती व अन्य साहित्याची वाहतूक करणारे अनेक ट्रक ये-जा करतात. मात्र, याकडे पोलिसांचे दुर्लक्ष आहे. क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक होत असल्याने कोळसा खाण परिसरातील रस्त्यांची दैन्यावस्था झाली. पोलिसांनी याला आळा घालण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. विशेषत: शेतपिकांचेही मोठे नुकसान होत आहे.
इंटरनेटअभावी ग्राहक त्रस्त
जिवती : तालुक्यातील बहुतांश गावात इंटरनेसेवा ढिम्म असल्याने नागरिकांना व्यवहार करताना अडचणीचा सामना करावा लागत आहे. काही बँकांमध्येही हीच समस्या असल्यामुळे ग्राहकांना ताटकळत रहावे लागते. त्यामुळे इंटरनेट सेवा सुरळीत करावी, अशी मागणी आहे.
नवीन वस्त्यांत रानडुकरांचा शिरकाव
चंद्रपूर : शहरातील काही नवीन वस्त्यांमध्ये डुकरे मोकाट फिरत असल्याने नागरिकांत दहशतीचे वातावरण आहे. त्यामुळे या डुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. बाहेर अंगणात छोटी बालके खेळत असल्याने धोका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बंदोबस्त करण्याची मागणी आहे.
योजनेपासून शेतकरी वंचित
चंद्रपूर : केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची घोषणा केली. काही शेतकऱ्यांना लाभ मिळाला असला तरी आजही अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. त्यामुळे शासनाने गावागावांत सर्व्हे करून योजनेचा लाभार्थींना लाभ द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
सिमेंटीकरणाची नागरिकांची मागणी
चंद्रपूर : येथील तुळशीनगर, वृंदावननगरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नाल्या नसल्यामुळे रस्त्यांवर चिखल साचत आहे. यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन येथील रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे.