अर्थसंकल्पाबाबत जिल्ह्यात संमिश्र प्रतिक्रिया

By Admin | Updated: March 1, 2016 00:40 IST2016-03-01T00:40:27+5:302016-03-01T00:40:27+5:30

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज सोमवारी संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर केला.

Composite reaction in the district regarding the budget | अर्थसंकल्पाबाबत जिल्ह्यात संमिश्र प्रतिक्रिया

अर्थसंकल्पाबाबत जिल्ह्यात संमिश्र प्रतिक्रिया

चंद्रपूर : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज सोमवारी संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाबाबत जिल्ह्यात संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या.

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींच्या बजेटमध्ये नवीन काहीच नाही. बजेट गरीबविरोधी आहे. कृषी कल्याण सेस ०.५ टक्के वाढवलेला असून प्रत्येक वस्तुंवर सर्व्हीस टॅक्स वाढविले आहे. अनेक वस्तुच्या किंमती वाढल्या आहे. इन्कम टॅक्स स्लॅब स्थिर ठेवण्यात आले आहे. शैक्षणिक कर्जावरसुद्धा विशेष लक्ष देण्यात आलेले नाही. आम आदमीसाठी बजेटमध्ये नवीन काहीच नाही.
- सुभाष धोटे,
माजी आमदार, राजुरा.

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेला बजेट अतिशय संतुलित आहे. याची योग्य अंमलबजावणी झाली पाहिजे. शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर सस्ते झाले पाहिजे. शेतकऱ्यांना स्वप्न दाखविले आहे. त्याची पूर्तता झाली पाहिजे. बजेटमध्ये केलेल्या प्रावधानाचा शेवटच्या माणसाला फायदा मिळाला पाहिजे.
- प्रभाकरराव मामूलकर,
माजी आमदार, राजुरा

अर्थमंत्री अरुण जेटलींचा अर्थसंकल्प सर्वसामान्यांसाठी कोणत्याही फायद्याचा नाही. शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणत्याही योजना या अर्थसंकल्पात नाही. देशातील बेरोजगारी दूर करण्यासाठी या बजेटमध्ये काहीही करण्यात आलेले नाही. केवळ अर्थमंत्र्यांनी आकड्याचा खेळ मांडला आहे. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कोणतेही खास धोरण दिसले नाही.
-किशोर जोरगेवार,
उपजिल्हा प्रमुख, शिवसेना, चंद्रपूर.

या अर्थसंकल्पात ‘लाँग रन’ साठी काही तरतूदी करण्यात आल्या आहेत. त्याचा आत्ताच इफेक्ट दिसणार नाही. मध्यमवर्गीयांचे समाधान होऊ शकेल, असा हा बजेट नाही. गरिबांना काय मिळेल, हे काही वर्षांनीच समजू शकणार आहे. मात्र महागाई वाढणार हे निश्चित आहे. शेतकऱ्यांसाठी सर्व्हीस टॅक्स वाढविण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना दिलासा मिळू शकणार आहे. वाहनांच्या किमती वाढविल्या आहेत.
-हर्षवर्धन सिंघवी, चार्टेड अकाऊंटन्ट, चंद्रपूर.

हा बजेट निराशाजनक आहे. शेतकऱ्यांची दयनीय परिस्थिती असताना या बजेटमध्ये सिंचनासाठी या बजेटमध्ये कुठलीही ठोस योजना दिसली नाही. उलट करात वाढ करण्यात आली आहे.
-संदीप गड्डमवार, अध्यक्ष,
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.

या अर्थसंकल्पात पैसा कुठून येणार (जादा अर्थशास्त्रीय भाषेत आला पैसा, गेला पैसा म्हटले जाते) याचे विस्तृत चित्रण दिसले नाही. भूमिहिन शेतकरी तसेच महिला सुरक्षासाठी काही विशेष तरतूद नाही. रेल्वे बजेटमध्ये तिकीट दर कमी केले. पण या अर्थसंकल्पात सेवा करात वाढ करण्यात आली. हा अर्थसंकल्प गरिबांसाठी चांगला असला तरी मध्यमवर्गीयांसाठी फार अडचणीचा आहे.
- प्रा. विजय गायकवाड, सावली.

अरुण जेटलींचा हा बजेट अत्यंत समाधानकारक आहे. या बजेटमध्ये देशाची अर्थव्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ग्रामीण भागासाठी या बजेटमध्ये चांगल्या तरतूदी आहेत. गरीब आणि शेतकऱ्यांसाठी या बजेटमध्ये बरेच काही आहे. जैविक शेती, सिंचन क्षेत्रात वाढ करण्याचा बजेटमध्ये प्रयत्न करण्यात आला आहे. चैनीच्या वस्तूंच्या किमती वाढविल्या आहेत. याचा मध्यमवर्गीयांना फटका बसणार आहे.
-प्रा. सुरेश चोपने, चंद्रपूर.

गुड सर्वीस टॅक्स (जीएसटी) अंमलात आणणे जरुरीचे होते. शेतकरी विमा योजनेच्या तरतुदीचा समावेश अल्प आहे. प्राथमिक गरज पूर्ण करण्याऐवजी संगणक शिक्षणावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे त्यावर पूनर्रविचार होणे आवश्यक आहे. एकूूणच सादर केलेला अर्थसंकल्प समाधानकारक आहे.
- संजय शिवणकर,
कर सल्लागार, ब्रह्मपुरी

बजेट खूप चांगला आहे. पण त्याची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. कुठलीही स्लॅब वाढविली नसल्याने तो निर्णय योग्य आहे. आरोग्यावर खर्च अतिशय कमी आहे. २ टक्केपर्यंत जीडीपी इतका खर्च होतो, तो देशाच्या तुलनेत कमी आहे. आरोग्य विमाबाबत कौतुकास्पद निर्णय आहे.
- डॉ. लक्ष्मीकांत लाढूकर, ब्रह्मपुरी

एकंदरीत बजेट चांगला आहे. शेतकऱ्यांसाठी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटवर भर दिला आहे. मध्यमवर्गीयांना इन्कम टॅक्सध्ये विशेष सवलत मिळाली नाही. परंतु सामान्य माणूस अर्थसंकल्पाचा केंद्रबिंदू केला आहे.
- डॉ. वासुदेवराव भांडारकर, प्राचार्य, ब्रह्मपुरी


केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेला अर्थसंकल्प देशाच्या विकासाला गती देणारा व सर्वांगीण क्षेत्राचा विकास साधणारा आहे. या अर्थसंकल्पातून कृषी व ग्रामीण विकासावर विशेष भर देण्यात आलेला आहे. शेतकरी, महिला, कामगार, बेरोजगार व अन्य घटकांना या अर्थसंकल्पातून न्याय देण्याचा प्रयत्न अर्थमंत्र्यांनी केला आहे.
-खा. हंसराज अहीर,
केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री.

जेटलींचे बजेट शेतकऱ्यांचे असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. व्याज आणि कर्जमुक्तीसाठी प्रावधानच नाही. रेल्वे आणि रस्ता बांधकामाच्या तुलनेत सिंचनाच्या कामावर कमी तरतूद केली आहे. पाच लाख रुपयापर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना तीन हजार रुपयांचा फायदा होणार आहे. मध्यमवर्गीयांना मात्र कसलीही सूट नाही. पेट्रोल आणि डिझेलवरील करवाढीमुळे महागाई वाढेल. काळा पैसा विदेशातून आणल्यावर प्रत्येकाच्या खात्यात रक्कम जमा करण्याची घोषणा पोकळ आहे.
-नरेश पुगलिया,
माजी खासदार, चंद्रपूर.

या अर्थसंकल्पात दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी व फायद्यासाठी कोणत्याही प्रकारची तरतूद करण्यात आलेली नाही. आम आदमीचाही विचार केलेला नाही. केवळ उद्योजकांचे हित जोपासण्यात आले आहे. वाढती महागाई रोखण्यासाठी कोणतेही ठोस पावले या अर्थसंकल्पात उचलण्यात आलेली नाहीत. त्यामुळे पुढे गृहिणींचे बजेट कोसळणार आहे.
-आ. विजय वडेट्टीवार
ब्रह्मपुरी , विधानसभा क्षेत्र.

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींचा अर्थसंकल्प अत्यंत चांगला व कल्याणकारी आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक निर्णय यात घेण्यात आले आहेत. लहान उद्योजकांना या अर्थसंकल्पात प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
-आ. नाना श्यामकुळे
चंद्रपूर, विधानसभा.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची योजना बजेटमध्ये असून यामुळे शेतकऱ्यांना पुढे मोठा दिलासा मिळणार आहे. शेताच्या सिंचनासाठी २० हजार कोटींचे प्रावधान केले. मनरेगा अंतर्गत देशात पाच लाख विहीर बांधून पाण्याचे स्रोत निर्माण केले जाणार आहे. एकंदरीत देशाच्या विकासासाठी हा बजेट फायद्याचा आहे.
- अ‍ॅड. संजय धोटे
आमदार, राजुरा

Web Title: Composite reaction in the district regarding the budget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.