Complete the work of Amrit Yojana within a month | अमृत योजनेचे काम महिनाभरात पूर्ण करा
अमृत योजनेचे काम महिनाभरात पूर्ण करा

ठळक मुद्देकिशोर जोरगेवार : आढावा बैठकीत मनपा आयुक्तांना निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्र्रपूर : नागरिकांना मुबलक पाणी देणे ही चंद्रपुरातील मनपाची जबाबदारी असली तरी मागील काही वर्षांपासून पाणी पुरवठा यंत्रणा कोलमडली आहे. पाणी पुरवठा सुरळीत करण्याच्या दिशेने अमृत योजनेचे काम महिनाभरात पूर्ण करण्याचे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा आयुक्तांना दिले. सोमवारी शासकीय विश्रामगृहातील आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी मनपा आयुक्त संजय काकडे व विभागप्रमुख उपस्थित होते. शहरातील विकासकामांची गती व प्रलंबित असलेली कामे आणि कारणे याबाबत आमदार जोरगेवार यांनी आयुक्त संजय काकडे यांच्याकडून माहिती जाणून घतली. शहरातील अनियमित पाणी पुरवठा, आझाद गार्डनच्या कामाची सद्यस्थिती, पाणी पुरवठा करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समस्या, मनपाच्या आरोग्य केंद्रांची देखरेख याबाबत आमदार जोरगेवार यांनी सूचना दिल्या. शहरात वाढीव वीज खांबांची व्यवस्था झाली की नाही, यावर चर्चा केली. नेताजी भवन सुरू करण्याबाबत काय अडचणी आहेत, मालमत्ता कर वाढीची कारणे आणि संडे मार्केट हटविल्याबाबतची माहितीही त्यांनी यावेळी जाणून घेतली. शिवाय रामाळा तलाव उद्यान स्वच्छता व खेळाचे साहित्य (बोट) तसेच विकासकामे करताना अडचणी सोडविण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासनही मनपा आयुक्तांना दिले. बाबूपेठमध्ये सुरू असलेल्या दोन पाण्याच्या टाकीचे काम जलद करा, असेही निर्देश दिले. मनपा आयुक्त यांनी काकडे यांनी ५२९ किलोमिटर नळाची नवीन पाईप लाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले असल्याची यावेळी माहिती दिली.

बंगाली कॅम्पची शाळा पुन्हा सुरू होणार?
बंगाली कॅम्प येथील मनपाची प्राथमिक शाळा बंद करून मनपाचे कार्यालय सुरू करण्यात आले. हे कार्यालय तातडीने बंद करून त्याच ठिकाणी मनपाची शाळा पूर्वरत सुरू करावी. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, याकडे आमदार किशोर जोरगेवार यांनी बैठकीत लक्ष वेधले.

Web Title:  Complete the work of Amrit Yojana within a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.