राजुरा तालुक्यातील रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:27 IST2021-03-25T04:27:04+5:302021-03-25T04:27:04+5:30
बांधकाम विभागाला दिले निवेदन राजुरा : रस्ते हे ग्रामीण विकासाची नाडी असल्यामुळे प्रमुख रस्त्यांना तसेच गावांना जोडण्याकरिता केंद्र सरकारने ...

राजुरा तालुक्यातील रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा
बांधकाम विभागाला दिले निवेदन
राजुरा : रस्ते हे ग्रामीण विकासाची नाडी असल्यामुळे प्रमुख रस्त्यांना तसेच गावांना जोडण्याकरिता केंद्र सरकारने अनेक दुर्लक्षित रस्त्यांची कामे हायब्रीड एन्युइटी योजनेअंतर्गत प्रस्तावित करून या रस्त्यांचे बांधकाम युध्दपातळीवर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मात्र रस्त्यांची ही कामे रेंगाळली आहेत. त्यामुळे ही कामे तातडीने पूर्ण करा, अशा मागणीचे निवेदन भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजू घरोटे यांनी बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे.
एका शिष्टमंडळाव्दारे कार्यकारी अभियंत्याची भेट घेऊन राजुरा तालुक्यातील वरील योजनेअंतर्गत सुरू असलेल्या रस्त्यांची कामे युध्दपातळीवर पूर्ण करण्यात यावीत, अशा आशयाचे निवेदन सादर केले. घरोटे यांनी या निवेदनाची प्रत माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांना सादर करून सदर रस्त्यांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना द्यावी, अशी विनंती केली आहे.
राजुरा तालुक्यातील पडोली ते राजुरा व्हाया कढोली-पोवनी रस्ता तसेच वनसडी ते पोवनी व्हाया नांदगाव-साखरी या रस्त्याचे बांधकाम सुरू झाले असले, तरी ते बराच कालावधी लोटूनही रखडले आहे. या मार्गावरून ये-जा करणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांना, वाहनधारकांना अत्यंत त्रासदायक ठरलेले आहे. त्यामुळे या दोन्ही रस्त्यांचे बांधकाम जलद गतीने पूर्ण करण्यात यावे व नागरिकांना होत असलेला त्रास दूर करावा, असे आवाहन त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून केले आहे. राजू घरोटे यांच्या नेतृत्वात सा. बां. विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटलेल्या शिष्टमंडळात कढोलीचे सरपंच राकेश हिंगाणे, सदस्य शैलेश चटके, अक्षय बोबडे, अंकुश आत्राम यांची उपस्थिती होती.