जादुटोण्याची तक्रार दखलपात्र व अजामीनपात्र
By Admin | Updated: September 27, 2014 01:26 IST2014-09-27T01:26:36+5:302014-09-27T01:26:36+5:30
महाराष्ट्रात दरवर्षी जादुटोण्याच्या संशयावरुन अनेक लोकांचे बळी जातात. याची दखल घेऊन आणि अंधश्रद्धा निर्मूलन..

जादुटोण्याची तक्रार दखलपात्र व अजामीनपात्र
सिंदेवाही : महाराष्ट्रात दरवर्षी जादुटोण्याच्या संशयावरुन अनेक लोकांचे बळी जातात. याची दखल घेऊन आणि अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीच्या अथक परिश्रमातून महाराष्ट्रात ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व त्यांचे समूळ उच्चाटन अधिनियम २०१३’ हा कायदा लागू करण्यात आला. त्यातही चंद्रपूर जिल्हा अंधश्रद्धाबाबात अतिशय संवेदनशील आहे. या जिल्ह्यात असे प्रकार आढळल्यास तात्काळ पोलिसांकडे तक्रार करा, असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे हरिभाऊ पाथोडे यांनी केले आहे.
या जिल्ह्यात दरवर्षी जादुटोणा, भूतकरणी, गुप्तधन या अंधश्रद्धापोटी बळी दिल्या जातो वा घेतल्या जातो. यावर्षी जुलै महिन्यात बल्लारपूर शहराजवळ बामणी गावात गुराख्याची जादुटोण्याच्या संशयापायी केलेली हत्या ताजी आहे.
तरीही या घटनांची दखल घेवून चंद्रपूर जिल्ह्यात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व त्यांचे समूळ उच्चाटन अधिनियम २०१३ हा कायदा लागू केला नाही, असे चित्र दिसत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात प्रत्येक पोलीस ठाण्यात जादुटोण्याच्या तक्रारी येत आहेत. महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व त्यांचे समूळ उच्चाटन अधिनियम २०१३ कलम २ पोटकलम (१) (ख) नुसार अनुसूचीमधील सहा क्रमांकाच्या बाबीनुसार एखादी विशिष्ट व्यक्ती करणी करते, जादुटोणा करते किंवा भूत लावते, असे सांगून त्या व्यक्तीबाबत तसा संशय निर्माण करणे, त्रासदायक कृत्य करणे वा कठीण करणे हा अपराध दखलपात्र व अजामिनपात्र आहे.
अशा गुन्ह्यांसाठी दोषी असलेली व्यक्ती, दोष सिद्ध झाल्यानंतर सात वर्षांपर्यंत फसू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची आणि ५० हजार रुपयांपर्यंत असू शकेल एवढ्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस पात्र आहे. या अधिनियमानुसार तक्रार दाखल केल्या जात नाही. सर्व तक्रारी अदखलपात्र गुन्हा म्हणून नोंदवून घेतात आणि न्यायालयात दाद मागण्याची समज देतात. (तालुका प्रतिनिधी)