नुकसान भरपाई द्या, अन्यथा कार्यालयाला कुलूप ठोकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 22:38 IST2018-11-16T22:37:55+5:302018-11-16T22:38:39+5:30

वरोरा तालुक्यातील वरोरा ते रायपूर (राजनांदगाव ) विद्युत कंपनीचे टॉवर उभारणीचे काम सुरू असून काही ठिकाणी टॉवर उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. टॉवर लाईनच्या कामामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे.

Compensate, otherwise lock the office | नुकसान भरपाई द्या, अन्यथा कार्यालयाला कुलूप ठोकणार

नुकसान भरपाई द्या, अन्यथा कार्यालयाला कुलूप ठोकणार

ठळक मुद्देटॉवर लाईनचे काम : बाळू धानोरकर यांचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : वरोरा तालुक्यातील वरोरा ते रायपूर (राजनांदगाव ) विद्युत कंपनीचे टॉवर उभारणीचे काम सुरू असून काही ठिकाणी टॉवर उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. टॉवर लाईनच्या कामामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे. मात्र त्यांना अद्यापही नुकसानीचा मोबदला देण्यात आला नाही. शेतकऱ्यांवर हा अन्याय दूर करावा, अन्यथा उपविभागीय अधिकारी कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा आ. बाळू धानोरकर यांनी दिला आहे.
या कामामुळे बाधित शेतकऱ्यांना ३१ मे २०१७ च्या शासननिर्णयानुसार मोबदला वाटपाची कार्यवाही पूर्ण केल्यानंतरच टॉवर उभारणीचे कामे पूर्ण करण्यास संबंधित कंपनीला निर्देश देण्याबाबत यापूर्वीच निवेदनाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्यात आले होते. परंतु स्थानिक शेतकऱ्यांनी त्यांचे लेखी स्वरूपात अर्ज सादर करूनही कंपनीने कोणत्याही प्रकारचा नुकसानीबाबतचा मोबदला न देता पोलिस संरक्षणामध्ये दबाव तंत्राचा वापर करून टॉवर उभारणीचे काम केले आहे, असे आ. धानोरकर यांनी म्हटले आहे.
ज्या ठिकाणी टॉवर उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. तेथील बाधित शेतकऱ्यांना पिकांचा योग्य मोबदला देण्यात आला नाही. शेतकऱ्यांना सदर शासन निर्णयानुसार मदतीचे पूर्ण वाटप करण्याबाबत वारंवार पाठपुरावा करूनदेखील शेतकऱ्यांना मोबदला दिल्या जात नाही, ही अतिशय खेदजनक बाब आहे. शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेल्या तक्रारीवरून असे निदर्शनास आले की, सदर कंपनीचे कर्मचारी तिवारी हे शेतकऱ्यांची दिशाभूल करून त्यांना जादा मोबदल्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून रक्कम उकळतात, असेही आ. धानोरकर यांनी म्हटले आहे.
याबाबत वारंवार पत्रव्यवहार केल्यानंतरही कुठलीही कार्यवाही केल्याचे दिसून येत नाही. शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेतच आहेत. यामुळे त्यांची विवंचना वाढली आहे. १९ नाव्हेंबरपर्यंत सदर कंपनीकडून बाधित शेतकऱ्यांना पीक नुकसानीबाबत मोबदला न मिळाल्यास २० नोव्हेंबर रोजी उपविभागीय अधिकारी कार्यलायाला कुलूप ठोकण्याचा इशारा आ. धानोरकर यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

Web Title: Compensate, otherwise lock the office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.