‘त्या’ वाघिणीच्या बंदोबस्तासाठी समिती
By Admin | Updated: August 6, 2014 23:44 IST2014-08-06T23:44:59+5:302014-08-06T23:44:59+5:30
चंद्रपूर वनवृत्तातील मध्य चांदा वनविभागातील कोठारी परिक्षेत्राअंतर्गत पोंभुर्णा उपक्षेत्रातील नियत क्षेत्र घनोटीमधील कक्ष क्र. ८७ मध्ये पांडुरंग आत्राम या चौकीदाराला वाघिणीने हल्ला करुन ठार केले.

‘त्या’ वाघिणीच्या बंदोबस्तासाठी समिती
चंद्रपूर : चंद्रपूर वनवृत्तातील मध्य चांदा वनविभागातील कोठारी परिक्षेत्राअंतर्गत पोंभुर्णा उपक्षेत्रातील नियत क्षेत्र घनोटीमधील कक्ष क्र. ८७ मध्ये पांडुरंग आत्राम या चौकीदाराला वाघिणीने हल्ला करुन ठार केले. या परिसरातच वाघिणीच्या हल्ल्याच्या चार घटना घडला. याची दखल नवी दिल्लीतील राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने घेतली आहे. त्यांच्या सूचनेनुसार वनविभाग, वन्यजीव विभाग, वनविकास महामंडळ यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांची मुख्य समिती स्थापन करण्यात आली असून त्याबाबत दररोज आढावा घेण्यात येत आहे.
बल्लारशाह परिक्षेत्रात एक तर वनविकास महामंडळाचे वनक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यामुळे मनुष्य हानीच्या चार घटना घडलेल्या आहेत. वरील सर्व घटना हे जवळपास पाच-सहा किमी त्रिजेच्या परिसरातील असल्यामुळे या घटना एकाच वाघिणीच्या हल्ल्यात झाल्या असाव्यात, असा अंदाज असल्यामुळे सदर वाघिणीच्या बंदोबस्तासाठी वनविभागाने कंबर कसली आहे. सदर वाघिण वनक्षेत्रामधून मानव वस्तीकडे येऊ नये व यापुढे वाघाच्या हल्ल्यामुळे मानव मृत्यूच्या घटना होऊ नये, याकरिता प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नागपूर येथून सदर वाघिणीला ट्रॅक्युलाईझ करुन जेरेबंद करण्यांची परवानगी मागण्यात आली. त्यानुसार १ आॅगस्टपासून वाघिणीला जेरबंद करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे. याकरिता कक्ष क्र. ८७ व ८८ मध्ये चार ठिकाणी भक्ष बांधण्यात आले असून दोन ठिकाणी पिंजरे लावण्यात आलेले आहे. दोन पशु वैद्यकीय अधिकारी व तीन ट्रॅक्युलाईझ करणारे कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहे. परिसरात दोन चमू दिवसा व रात्री गस्त करीत आहे.
संपूर्ण परिसरात कॅमेरा ट्रॅप लावण्यात आलेले आहे. तसेच गावकऱ्यांना वनक्षेत्रात जाऊ नये, याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. गस्ती पथक व इतर कर्मचारी घनोटी येथे मुक्कामी आहेत. (शहर प्रतिनिधी)