महापौरांसह ११ जणांना आयुक्तांनी बजावला नोटीस
By Admin | Updated: March 12, 2015 00:35 IST2015-03-12T00:35:39+5:302015-03-12T00:35:39+5:30
काँग्रेसला सोडून भाजपात प्रवेश करणाऱ्या महापौर राखी कंचर्लावार, काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराविरोधात मतदान करणारे मनपा सभापती रामू तिवारी ...

महापौरांसह ११ जणांना आयुक्तांनी बजावला नोटीस
चंद्रपूर : काँग्रेसला सोडून भाजपात प्रवेश करणाऱ्या महापौर राखी कंचर्लावार, काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराविरोधात मतदान करणारे मनपा सभापती रामू तिवारी व अन्य दहा नगरसेवकांना अपात्र का करण्यात येऊ नये, या आशयाचा विभागीय आयुक्तांनी नोटीस बजावली आहे. यामुळे पुन्हा एकदा वाद चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे.
काँग्रेसच्या सुनिता लोढीया तसेच काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश करणाऱ्या राखी कंचर्लावार या भाजपाच्या महापौर पदाच्या उमेदवार होत्या. यात भाजपच्या राखी कंचर्लावार विजयी झाल्या. दरम्यान, पक्षांतर्गत बंदी कायद्यांतर्गत सुनिता लोढीया यांनी विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्याकडे १६ डिसेंबरला दाद मागितली. त्यानंतर २३ जानेवारी २०१५ रोजी महापौर कंचर्लावार, सभापती रामू तिवारी व दहा नगरसेवकांना अपात्र घोषित करावे, यासाठी आयुक्तांनी प्रकरण दाखल केले. ४ मार्चला महापौर कंचर्लावार, सभापती रामू तिवारी, नगरसेवक संगीता अमृतकर, दुर्गेश कोडाम, राजेश अडूर, करीमलाला काझी, अनिल रामटेके, मेहर सिडाम, एकता गुरनुले व संतोष लहामगे यांना अपात्र का घोषित करू नये, या आशयाची नोटीस बजावली आहे.
महापौरपदासाठी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार लोढीया असताना या सर्वांनी त्यांच्या विरोधात जाऊन भाजपात प्रवेश करणाऱ्या कंचर्लावार यांना मतदान केले. विशेष म्हणजे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला मतदान करा, असा व्हीप जारी केला होता. या व्हीपला केराची टोपली दाखवून मतदान करण्यात आले. त्यामुळेच या सर्वांना नोटीस बजावण्यात आला आहेत. यासंदर्भात २३ मार्चला आयुक्तांच्या कार्यालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीला सर्वांना हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.(शहर प्रतिनिधी)