कमिशनचा वाद आला चव्हाट्यावर
By Admin | Updated: May 16, 2016 00:52 IST2016-05-16T00:52:04+5:302016-05-16T00:52:04+5:30
गेल्या काही महिन्यांपासून येथील नगरपालिकेत कमिशनचा वाद चांगलाच गाजत आहे.

कमिशनचा वाद आला चव्हाट्यावर
वरोराच्या नगराध्यक्ष नामधारी : कंत्राटदाराने सादर केले कमिशन मागितल्याचे पुरावे
वरोरा : गेल्या काही महिन्यांपासून येथील नगरपालिकेत कमिशनचा वाद चांगलाच गाजत आहे. त्यातच येथील नगराध्यक्ष जनाबाई पिंपळशेंडे यांनी एका कंत्राटदाराविरुद्ध पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दाखल केल्याने गेल्या चार-पाच दिवसांपासून येथील नगर पालिकेचे राजकारण चांगलेच तापले आहे.
दरम्यान, नगराध्यक्ष जनाबाई पिंपळशेंडे यांनी ज्या कंत्राटदाराविरुद्ध विनयभंगाची तक्रार दाखल केली, त्या अमोल सोनेकर यांनी रविवारी सायंकाळी येथे पत्रकार परिषद घेतली. त्यात स्वीकृत सदस्य राजू महाजन यांनी कमिशन मागितल्याचे व्हिडिओ आणि आॅडिओ क्लीप सादर करून चांगलीच खळबळ उडवून दिली.
स्वत:च्या स्वार्थासाठी सर्वकाही करायला तयार असणारे अधिकारी आणि पदाधिकारी वरोरा नगरपालिकेला मिळाले, हे वरोऱ्याच्या जनतेचे अहोभाग्यच आहे, असे आता उपहासाने नागरिक बोलू लागले आहे. गेल्या चार दिवसापासून वरोरा नगरपालिकेतील राजकारण चांग राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. वरोराच्या नगराध्यक्षा जनाबाई मंगल पिंपळशेंडे यांनी एका कंत्राटदाराविरूद्ध वरोरा पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार केली. त्यावरून चांगलाच वादंग माजला आहे. हा सर्व प्रकार कमिशनच्या देवाणघेवाणीवरूनच झाल्याचे वास्तव आता समोर येऊ लागले आहे. त्यामुळे आता नगरपालिकेतील पुढाऱ्यांचे खरे चेहरे उघड झाले आहेत.
काही वर्षांआधी निवडणुकीदरम्यान मालविय वॉर्डातीलच प्रशांत डफ नावाच्या व्यक्तीच्या पत्नीने विद्यमान नगराध्यक्ष जनाबाई पिंपळशेंडे यांच्याविरोधात निवडणूक लढविली होती. त्यानंतर काही दिवसात जनाबाई पिंपळशेंडे यांनी डफ यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात अश्लील शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार केली होती. पोलिसांवर राजकीय दबाव आणून प्रशांत डफ यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यास पोलिसांना भाग पाडले होते. जनाबाई पिंपळशेंडे यांच्या वॉर्डातच राहणाऱ्या एका सामान्य अशिक्षित अनुसूचित जातीच्या व्यक्तीच्या विरोधात अशाच प्रकारची तक्रार दबाव आणून नोंदविण्यात आली होती. मालविय वॉर्डातील अतिक्रमित जागेत देवालय बांधण्यात आले. या मंदिरात सर्व जातीच्या भक्तांना प्रवेश असतानाही या गरीब अनुसूचित जातीच्या व्यक्तीच्या मुलाला या मंदिरात मज्जाव करण्यात आला होता. यातूनच नवीन वादाला तोंड फुटले होते. साईचे मंदिरात सर्व जाती-धर्माच्या लोकांना प्रवेश असतो. प्रत्येक जण साईबाबांना आपले दैवत मानतात. साईबाबांनीही सर्व धर्माची शिकवण देत उचनीचतेचा भेदभाव विसरून आपण सारे देवाचीच लेकरे आहोत, असा संदेश दिला. मात्र जनाबाई पिंपळशेंडे यांच्या राजकीय दबावामुळे सामान्य व्यक्तींना पोलीस ठाण्याचे उंबरठे ओलांडावे लागले. मात्र या प्रकरणात न्यायालयात धाव घेण्यात आली. त्यातून मालविय वॉर्डात बांधण्यात आलेले हे मंदिर अनधिकृत असल्याने ते पाडण्याचे आदेश देण्यात आले. तसेच लावण्यात आलेले आरोप न्यायालयासमोर सिद्ध न झाल्याने निर्दोष मुक्तता करण्यात आली. (शहर प्रतिनिधी)
जीवे मारण्याच्या धमक्या
कंत्राटदार अमोल सोनेकर यांनी पत्रकार परिषदेत व्हिडिओ आणि आॅडिओ क्लीप दाखविली. राजू महाजन यांनी आपल्याला कमिशन मागितल्याचा दावा सोनकर यांनी केला. आता आपल्याला त्यांच्याकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असून त्यांच्यापासून आपल्या जीवाला धोका निर्माण झाला असल्याचे त्यांनी सांगितले.