घरगुती सिलिंडरचा व्यावसायिक वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:28 IST2021-04-02T04:28:56+5:302021-04-02T04:28:56+5:30
मागील काही दिवसांपासून सिलिंडरचे दर वाढत आहेत. त्यामुळे सामान्य ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आले आहे. गरीब कुटुंबीय सरपण ...

घरगुती सिलिंडरचा व्यावसायिक वापर
मागील काही दिवसांपासून सिलिंडरचे दर वाढत आहेत. त्यामुळे सामान्य ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आले आहे. गरीब कुटुंबीय सरपण गोळा करून स्वयंपाक करीत असल्याचे चित्र काही भागात बघायला मिळत आहे.
शासनाने स्वयंपाकाचा गॅस व व्यावसायिक गॅस असे दोन प्रकारात गॅसचे विभाजन केले आहे. व्यावसायिकांच्या तुलनेत घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त पडतो. मात्र, काही व्यावसायिक या सिलिंडरचा वापर करून अधिक नफा कमवाण्याचा प्रयत्न करीत आहेत.
चहा टपरी, चायनीज, हॉटेल्स, रेस्टॉरंटमध्ये घरगुती लाल सिलिंडरचा वापर होत आहे. अनेक उत्सव समारंभातही लाल सिलिंडरचा वापर केला जातो. एवढेच नाही, काही कॅटरर्स व्यावसायिकही लाल सिलिंडरचा वापर करताना दिसून येत आहे. घरगुती सिलिंडर १४ कि. ग्रॅम, तर व्यावसायिकांसाठी निळ्या रंगाचे १९ कि.ग्रॅमचे सिलिंडर असतात. मात्र, किमत जास्त असल्यामुळे व्यावसायिक घरगुती सिलिंडरचा अधिक वापर करीत आहेत.
उज्ज्वलाचे सिलिंडर रिकामेच
महिलांच्या आरोग्याची काळजी लक्षात घेता केंद्र सरकारने उज्ज्वला योजना सुरु केली. अनेक गरजुंना गॅस तसेच सिलिंडरचे वितरण केले. मात्र, सततच्या महागाईमुळे सिलिंडर घेणे परवडणारे नसल्याने या योजनेतील बहुतांश महिलांनी पुन्हा चुलीवरच स्वयंपाक करणे पसंत केले आहे. तर काही व्यावसायिक गरीब नागरिकांकडील सिलिंडर घेऊन तो व्यवसायामध्ये वापरत असल्याचेही बोलले जात आहे.