प्रशासकीय मान्यता न घेता शौचालयाच्या कामाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:27 IST2021-04-25T04:27:49+5:302021-04-25T04:27:49+5:30
: कोलारा ग्रामपंचायतीने थांबविले काम मासळ बु. : कोलारा गाव वनविभागाच्या बफर व कोर झोनच्या गेटलगत असल्याने येथूनच ...

प्रशासकीय मान्यता न घेता शौचालयाच्या कामाला सुरुवात
: कोलारा ग्रामपंचायतीने थांबविले काम
मासळ बु. : कोलारा गाव वनविभागाच्या बफर व कोर झोनच्या गेटलगत असल्याने येथूनच देश-विदेशांतील पर्यटक सफारीकरिता कोलारा गेट परिसरातील रिसोर्टमध्ये मुक्कामाने येत असतात. ये-जा करण्याचा एकच मुख्य मार्ग असल्याने गावातील नागरिक याच मार्गावर शौचालयासाठी जातात. जिल्हा परिषदेने स्वच्छ भारत मिशन अभियानाअंतर्गत कोलारा गावातील मार्गाच्या कडेला सार्वजनिक शौचालय मंजूर केले. मात्र ठेकेदारांनी कोलारा ग्रामपंचायतीची प्रशासकीय मान्यता न घेता सार्वजनिक शौचालयाच्या कामाला सुरुवात केली.
त्यामुळे संतप्त ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी सदर बांधकाम थांबवून कंत्राटदारावर कार्यवाही करण्याची मागणी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रपूर यांना केली आहे.
शौचालयाच्या कामाला सुरुवात झाल्याचे दिसताच ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी कामाची मोक्का चौकशी केली असता बांधकाम अनधिकृत असल्याचे आढळून आले.
स्वच्छ भारत मिशन अभियानअंतर्गत पर्यटकांच्या सोयी-सुविधांच्या दृष्टिकोनातून कोलारा गावासाठी सार्वजनिक शौचालय मंजूर कामाचे अंदाजपत्रक कंत्राटदार यांनी परस्पर जिल्हा परिषद, चंद्रपूर येथून आणले. स्वत:च्या मर्जीने हुकुमशाही पद्धतीने सार्वजनिक शौचालयाच्या बांधकामाला सुरुवात केली. त्यामुळे सदर शौचालयाचे बांधकाम बंद करून कंत्राटदार यांचा परवाना रद्द करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा करावा, अशा आशयाची तक्रार जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, ठाणेदार पोलीस स्टेशन चिमूर व संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती चिमूर यांना कोलारा ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी केली आहे.
कोट
ग्रामपंचायतीमध्ये मासिक बैठक सुरू असताना कंत्राटदार आला. मला जिल्हा परिषदेने शौचालय बांधकाम दिले आहे, असे म्हणाला. याविषयी ग्रामपंचायतीला कोणतीही माहिती नाही. ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता कंत्राटदाराने अनधिकृत बांधकामाला सुरुवात केली. सदर बांधकाम हे निष्कृष्ट दर्जाचे आहे. ग्रामपंचायतीने शौचालयाचे बांधकाम थांबविले असून, वरिष्ठांकडे तक्रार केली आहे.
- शोभा कोयचाडे सरपंच, ग्रामपंचायत कोलारा (तु.)