आयो जाओ घर तुम्हारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:27 IST2021-03-19T04:27:01+5:302021-03-19T04:27:01+5:30
रिॲलिटी चेक चंद्रपूर : मागील काही दिवसापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने उपाययोजना केल्या आहे. ...

आयो जाओ घर तुम्हारा
रिॲलिटी चेक
चंद्रपूर : मागील काही दिवसापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने उपाययोजना केल्या आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहनही केले आहे. मात्र आजही कुठेच नियमांचे पालन केले जात नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, रेल्वे स्टेशन, बसस्थानक एवढेच नाही तर जिल्हा सीमाही मोकळ्याच आहे. त्यामुळे आओ जाओ घर तुम्हारा, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
जिल्ह्यात सध्या हजारावर रुग्णसंख्या पोहचली असून आजपर्यंत एकूण रुग्णसंख्या २५ हजारावर गेली आहे. विशेष म्हणजे, ४०६ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे कोरोनासंदर्भात काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यातच जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या यवतमाळ तसेच वर्धा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत आहे. या जिल्ह्यांमध्ये लाॅकडाऊनची स्थिती निर्माण झाली आहे. नागपूर येथे तर लाॅकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील बसस्थानक, रेल्वे स्टेशन, जिल्हा सीमांवर तपासणी करणे तसेच येथील गर्दीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. मात्र कुठेही नियम पाळल्या जात नसल्याचे बघायला मिळत आहे. रेल्वे स्टेशनवर काही ठिकाणी तपासणी केंद्र उघडण्यात आले आहे. मात्र प्रत्येक प्रवाशांची तपासणी केलीच जात नसल्याचे दिसते. त्यामुळे कोरोनाचा जिल्ह्यात संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बाॅक्स
बसस्थानकावर गर्दी वाढली
औद्योगिक शहर असलेल्या चंद्रपूरमध्ये बाहेर राज्यातील तसेच विदर्भातील नागरिकांची सारखी वर्दळ असते. त्यातच सध्या लग्नसमारंभाचा हंगाम आहे. त्यामुळे बसस्थानकावर गर्दी बघायला मिळत आहे. मात्र येथे कुठेच प्रवाशांना विचारपूस किंवा तपासणी केली जात नाही.
बसस्थानक परिसरात असलेल्या खुर्च्यांवर दाटीवाटीने बसून प्रवासी बसची वाट बघत असल्याचे दिसते.
रेल्वेस्थानकावर तपासणी नाही
चंद्रपूर तसेच बल्लारशा रेल्वे स्थानकावर प्रवाशांची संख्या मोठी आहे. बल्लारपूर येथे तर जंक्शन असल्यामुळे प्रत्येक रेल्वेगाड्या थांबतात. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येकांची तपासणी करणे गरजेचे आहे. मात्र अपवाद सो़डला तर तपासणी केली जात नसून प्रवाशांची कुठेही नोंदणी सुद्धा होत नसल्याचे दिसते. विशेष म्हणजे, तिकीट खिडकीजवळही मोठ्या प्रमाणात प्रवासी गर्दी करीत आहे. त्यांना गर्दी टाळण्यासंदर्भातही कुठेच आवाहन केले जात नाही.
जिल्हासीमा सर्वांसाठी मोकळ्या
चंद्रपूर जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा सुरु आहे. मात्र कोरोनासंदर्भात कोणालाच सध्यातरी अडविले जात नसल्याचे चित्र आहे. अपवादाला घुग्घुस तसेच चंद्रपूर-नागपूर रोडवरील सीमांवर पोलीस कर्मचारी असतात. मात्र ते दारुबंदीबाबत तपासणी करतात. अन्य सीमा सर्वांसाठी खुल्या आहेत.
बाॅक्स
वाढत्या संसर्गात काय उपाययोजना
जिल्ह्यात सध्यास्थितीत रुग्णसंख्या हजारावर पोहचली आहे. मात्र सध्यातरी लाॅकडाऊनसंदर्भात निर्णय घेण्यात आला नाही. दरम्यान, हाॅटेल, तसेच चित्रपटगृहांमध्ये ५० टक्के क्षमतेचे चालविण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. सोबतच बाधितांच्या घरासमोर फलक लावण्यात येणार असून सर्व सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. विवाह समारंभाला परवानगी घेतल्यानंतर ५० जणांना उपस्थित राहता येणार असून अंत्यविधीसाठी २० जणांनाच उपस्थित राहता येणार आहे. नियमांचा भंग केल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापक कायद्याअंतर्गत कारवाई केली जाणार आहे.