सलील वर्धेचे जिल्हाधिकारी
By Admin | Updated: May 28, 2015 00:09 IST2015-05-28T00:09:30+5:302015-05-28T00:09:30+5:30
जनतेसाठी राबविण्यात आलेले विविध उपक्रम आणि लोकाभिमुख प्रशासन यासाठी संपूर्ण जिल्ह्यात परिचित झालेले ..

सलील वर्धेचे जिल्हाधिकारी
चंद्रपूर : जनतेसाठी राबविण्यात आलेले विविध उपक्रम आणि लोकाभिमुख प्रशासन यासाठी संपूर्ण जिल्ह्यात परिचित झालेले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील हे वर्धा येथे जिल्हाधिकारी म्हणून जात आहेत.
मागील दोन वर्षांहून अधिक काळापासून आशुतोष सलील चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यापूर्वी ते चंद्रपूर आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी म्हणूनही कार्यरत होते. २०१० पासून ते भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल आहेत. लोकाभिमुख अधिकारी अशी प्रतिमा आपल्या कार्यप्रणालीतून निर्माण करणारे आशुतोष सलील यांनी आपल्या उत्पन्नाची पाटी आपल्या कार्यालयातील कक्षापुढे लावली होती. आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातून जिल्हा परिषदेमध्ये आल्यावर येथेही त्यांनी ही परंपरा कायम राखत अशीच पाटी लावून पारदर्शकता जोपासण्याचा प्रयत्न केला होता. जिल्हा परिषदेमध्ये विविध उपक्रम आणि योजना राबविण्यासोबतच त्याच्या अंमलबजावणीवरही त्यांचा भर असायचा.
सलील यांच्या रिक्त पदावर राज्य खनिकर्म महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक एम. पी. कल्याणकुमार हे नागपूरवरून बदलून येत आहेत. सलील पदभार कधी सोडणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. (जिल्हा प्रतिनिधी)