स्त्री भ्रूण हत्या रोखणे सामूहिक जबाबदारी
By Admin | Updated: March 26, 2015 00:53 IST2015-03-26T00:53:27+5:302015-03-26T00:53:27+5:30
लिंग निदान ही समाजाला लागलेली कीड असून मुलगी वाचविणे तसेच स्त्री भ्रूण हत्या रोखणे ही सामुहिक जबाबदारी आहे.

स्त्री भ्रूण हत्या रोखणे सामूहिक जबाबदारी
चंद्रपूर : लिंग निदान ही समाजाला लागलेली कीड असून मुलगी वाचविणे तसेच स्त्री भ्रूण हत्या रोखणे ही सामुहिक जबाबदारी आहे. भविष्यात सामाजिक असमतोल बिघडू नये यासाठी सर्वांनी मिळून लिंग निदान प्रक्रियेला प्रतिबंध घालत लेक वाचविण्याची जबाबदारी सामूहिकपणे पार पाडावी, असे मत महापौर राखी कंचर्लावार यांनी केले.
जिल्हा सामान्य रुग्णालय व महानगर पालिकेच्या संयुक्त विद्यमाने महानगरपालिका सभागृहात आयोजित पीसीपिएनडीटी अंतर्गत एक दिवशीय कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी आयुक्त सुधीर शंभरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पी.एम.मुरंबीकर, डॉ.श्रीराम गोगुलवार, डॉ. प्रेरणा कोलते, डॉ.रजणी हजारे, अॅड.मेघा महाजन व अॅड.विजया बांगडे उपस्थित होते.
समुचित प्राधिकारी व सल्लागार समिती सदस्यांसाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे उदघाटन डॉ.श्रीराम गोगुलवार यांच्या हस्ते करण्यात आले. मुला-मुलींचे प्रमाण पाहता भविष्यात ही समस्या गंभीर रुप धारण करेल, अशी परिस्थिती आताच दिसत असल्याचे महापौर म्हणाल्या. समाजाने आपली भूमिका समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास स्त्रीभृण हत्या थांबविण्यास मोठी मदत होईल असे डॉ.श्रीराम गोगुलवार यांनी सांगितले. ग्रामीण व शहरी भागातील मुला-मुलींच्या जन्माचे प्रमाण यावर आरोग्य विभाग अभ्यास करत असून अहवाल लवकरच तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात लिंग निदान करण्याची मानसिकता अधिक असल्याचे सांगून गोगुलवार म्हणाले की, हे लोन आता ग्रामीण भागाकडे सरकत आहे. ही बाब सामाजिक असमतेला खतपाणी घालणारी आहे. आपल्या अवती भोवती लिंग निदान होत असल्याचे दृष्टीस येताच समाजाने जागल्याची भूमिका बजाविणे गरजेचे असल्याचे आयुक्त सुधीर शंभरकर यांनी सांगितले. पीसीपीएनडीटी कायद्याची कठोर अंमलबजावणी शासन करत असून कायदयाचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाही केली जाईल, असा इशारा डॉ.मुरंबीकर यांनी दिला.प्रास्ताविक डॉ.अंजली आंबटकर यांनी केले. आभार बोरीकर यांनी मानले. या कार्यशाळेस समुचित प्राधिकारी, सल्लागार समिती सदस्य, समाज सेवक व डॉक्टर मोठया संख्येने उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)