थंडीचा पारा १२.६ अंशावर
By Admin | Updated: December 26, 2015 01:13 IST2015-12-26T01:13:59+5:302015-12-26T01:13:59+5:30
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात थंडीचा पारा वाढला असून शुक्रवारी दिवसभर थंडी जाणवली.

थंडीचा पारा १२.६ अंशावर
हुडहुडी वाढली : गरम कपडे वापरण्याकडे कल
चंद्रपूर : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात थंडीचा पारा वाढला असून शुक्रवारी दिवसभर थंडी जाणवली. त्यामुळे सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास अनेक ठिकाणी शेकोट्या पेटताना दिसल्या. हवामान खात्याच्या माहितीनुसार शुक्रवारी १२.६ सेल्सीअस तापमानाची नोंद झाली.
थंडीचा महिना सुरू झाला की, मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणाऱ्या मंडळींची संख्या वाढते. रोजच्या कामकाजातून घरातील मंडळीसाठी तसेच मित्रांसाठी वेळ काढणे कठीण असते. त्यामुळे सकाळी व्यायाम, खेळणे तसेच कार्यालयातील काम, घरातील मंडळीची रंगलेली चर्चा एककीडे तर खेळाचा आनंद घेणारी मंडळी दुसरीकडे असे चित्र सध्या दिसत आहे.
कॉलेजची तरुणाई, मध्यमवयीने व वृद्धापर्यंत सर्वजण मॉर्निंग वॉकसाठी जिल्हा स्टेडियम, आझाद बगीचा, पठाणपुरा बाग व शहरातील मोकळ्या मैदानांवर एकत्र येत असल्याने वयोमानानुसार त्यांच्या गप्पादेखील विविध स्वरुपाच्या रंगत आहेत. मात्र या निमित्ताने शहरात पडणाऱ्या गुलाबी हवेची मजा सर्वच वयोगटातील नागरिक घेत आहेत.
थंंडीची चाहुल वाढल्याने एरवी सकाळी ५ वाजतापासून घराबाहेर पडणारे लहानांपासून तर आबालवृद्धांपर्यंत नागरिक गारव्यांमुळे सकाळचच्या कोहळ्या उन्हात बाहेर पडणे पसंत करतात. थंडीची झळ असह्य होत असल्यामुळे शहरातील मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांचे मागील तीन चार दिवसांपासून सकाळी फिरण्याचे वेळापत्रक बिघडले आहे. परिणामी सकाळी फुलून दिसणारी फिरणाऱ्यांची गर्दी ओसरत थंडीच्या पाऱ्यामुळे उशिरा शहराच्या प्रमुख ठिकाणी फिरण्यांसाठी असलेल्या ठिकाणांवर दिसून येत आहे. तर काही नागरिक उलनचे कपडे घेण्यासाठी दुकानात गर्दी करीत असल्याचे चित्र आहे. थंडीपासून बचाव करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)