कोलाम जातीच्या प्रमाणपत्रापासून वंचित
By Admin | Updated: December 24, 2014 22:58 IST2014-12-24T22:58:17+5:302014-12-24T22:58:17+5:30
राजुरा तालुक्यातील कोस्टाळा ग्रामपंचायत अंतर्गत घोट्टा येथील कोलामांनी जातीच्या प्रमाणपत्रासाठी राजुरा तहसील कार्यालयात कागदपत्रासह ६ जानेवारी २०१४ ला अर्ज दाखल केला.

कोलाम जातीच्या प्रमाणपत्रापासून वंचित
राजुरा : राजुरा तालुक्यातील कोस्टाळा ग्रामपंचायत अंतर्गत घोट्टा येथील कोलामांनी जातीच्या प्रमाणपत्रासाठी राजुरा तहसील कार्यालयात कागदपत्रासह ६ जानेवारी २०१४ ला अर्ज दाखल केला. परंतु अद्याप त्यांना कोणतीही सूचना संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आली नाही. त्यामुळे गोरगरीब अशिक्षित कोलामांची पायपीट एक वर्षांपासून सतत सुरू आहे.
घोट्टा येथील आदिवासी कोलाम सुमारे ४० वर्षांपासून वास्तव्य करीत आहे. त्यांच्याकडे सन १९५० च्याव वास्तव्याचा कोणताही पुरावा नाही. कोलामांचे पूर्वज राजुरा तालुक्यातील माणिकगड पहाडावरील नाल्याकिनाऱ्या दुर्गम जंगल भागात राहून वास्तव्य करीत होते. त्यांचे वास्तव्य अस्थिर होते. वास्तव्याठिकाणी कोलामगुड्यावर एखाद्याचा मृत्यू झाल्यास वास्तव्याची जागा सोडून दुसरीकडे वास्तव्य करणे ही त्याची पद्धत आहे. त्यामुळेच त्यांच्याकडे स्थिर वास्तव्याचे पुरावे नाहीत. सध्या घोट्टा येथे ४० वर्षांपासून शासनाच्या जमिनीवर अतिक्रमण करून जीवन जगत आहे. कोलाम अशिक्षित असल्यामुळे त्यांच्यापैकी कुणीही शासकीय नव्हता. शेती व बांबुपासून तट्टे बनवून त्यावर आपल्या कुटुंबाची उपजीविका करणे हे त्यांचे काम होते. आम जनतेच्या सान्निध्यात राहण्याची त्यांना सवय नाही. त्यांची राहण्याची वेगळी पद्धत आहे. त्याची भाषा, राहणीमान, नाव, खाणेपिणे, पोषाक आदी सर्वसामान्य नागरिकांपैक्षा वेगळे आहे.
सध्या कोलामांना सर्वसामान्य नागरिकांकडे पाहून आपली मुलंबाळं शिक्षित झाले पाहिजे, आपणही शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, असे वाटत आहे. यासाठी त्यांनी धडपड सुरू केली आहे. परंतु त्यांची धडपड जातीच्या प्रमाणपत्राअभावी संपुष्टात आली आहे. राजुरा तहसील कार्यालयात ६ जानेवारी २०१४ ला जातीच्या प्रमाणपत्रासाठी अर्ज करूनसुद्धा त्यांना काहीच कळविण्यात आले नाही. त्यांच्या अर्जाची फाईलसुद्धा गायब झालेली आहे. अधिकारीसुद्धा त्यांना भेटू देत नाही. यामुळे कोलाम समाजबांधव हताश झाले आहेत. त्यामुळे शासनाने या समाजाकडे लक्ष द्यावे. (तालुका प्रतिनिधी)