६ जानेवारीला आचारसंहिता ?
By Admin | Updated: January 3, 2017 00:36 IST2017-01-03T00:36:47+5:302017-01-03T00:36:47+5:30
सर्वांना जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची प्रतीक्षा आहे. आचारसंहिता कधी लागू होते, याची वाट पाहणे सुरू आहे.

६ जानेवारीला आचारसंहिता ?
जिल्हा परिषदेचा रणसंग्राम : नेत्यांना भूमिपूजनाची लगीनघाई
चंद्रपूर : सर्वांना जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची प्रतीक्षा आहे. आचारसंहिता कधी लागू होते, याची वाट पाहणे सुरू आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच शासकीय निधीतून विकास कामांचे भूमिपूजन आटोपले पाहिजे, अशी घाई मंत्री, आमदारांकडून सुरु आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेचा ताण वाढला आहे. बहुप्रतीक्षित आचारसंहिता ६ वा ७ जानेवारी रोजी लागू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या तारखा लक्षात घेऊन प्रशासकीय पातळीवर कामे मार्गी लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
चंद्रपूर जिल्हा परिषदेसाठी ५६ मतदारसंघ आहेत. पंचायत समित्यांचे त्याच्या दुप्पट म्हणजे ११२ मतदारसंघ आहेत. जिल्हा परिषदेची मुदत फेब्रुवारी महिन्यात संपत आहे. या मुदतीपूर्वी नवीन जिल्हा परिषद अस्तित्त्वात येणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेची निवडणूक फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा घेण्यात आली.
ही सर्वसाधारण सभा या जिल्हा परिषदेची शेवटची सर्वसाधारण सभा ठरण्याची शक्यता आहे. या सर्वसाधारण सभेपूर्वीच जिल्हा परिषद सदस्य चंद्रपूरमध्ये येणे बंद झाले. केवळ अडलेली कामे निकाली काढण्यासाठी सदस्य जिल्हा परिषदेत धाव घेत आहेत. उर्वरित सर्व वेळ आपापल्या मतदारसंघाला देण्यात येत आहे.
जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व सदस्य आपापल्या मतदारसंघातील विकास कामे लोकांपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच वेळी आमदारांच्या स्थानिक विकास निधीमधून ग्रामीण भागात विकास कामांचे भूमिपूजन सुरू आहे. आमदारांनी भूमिपूजनाचा सपाटा लावला आहे. नालीचे बांधकाम, रस्त्याचे डांबरीकरण, रस्त्याचे काँक्रीटीकरण आदींचे भूमिपूजन आटोपण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
६ वा ७ जानेवारीला निवडणूक कार्यक्रमाची घोषणा?
६ जानेवारीपूर्वी विकास कामांचे भूमिपूजन किंवा उद्घाटन कार्यक्रावर भर देण्यात येत आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने ग्रामीण भागातील रस्त्यांची कामेदेखील ५ जानेवारीपर्यंत कार्यादेशापर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रशासनाची लगबग लक्षात घेता जिल्हा परिषद निवडणूक कार्यक्रमाची घोषणा ६ किंवा ७ जानेवारी रोजी करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जिल्हाधिकारी आशुतोष सलील ३ जानेवारी रोजी सुटीवरून परत येत आहेत. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाची मंजुरी घेऊन जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचा निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता आहे.
२१ जानेवारीला मतदार
यादीचे प्रकाशन
जिल्हा परिषदेच्या ५६ मतदारसंघामध्ये ११ लाख मतदार आहेत. जिल्हा निवडणूक विभागाने मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम राबविला. त्यामध्ये नवीन मतदारांची नोंदणी आणि घर सोडून गेलेल्या मतदारांची नावे कमी करण्यात आली. मतदारांची निवडणूकपूर्व अंतिम यादी २१ जानेवारी रोजी प्रकाशित करण्यात येत आहे. त्यानंतर उमेदवारी अर्ज भरणे सुरू होणार आहे. इयत्ता दहावीच्या परीक्षा सुरू होण्यापूर्वीच जिल्हा परिषद निवडणुकीची सर्व प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
५ जानेवारीला
रतन टाटा चंद्रपुरात
वन विभागाने चंद्रपूर जिल्ह्यात आधुनिक बांबू प्रकल्प उभारण्याचे ठरविले आहे. त्याकरिता टाटा ट्रस्टशी ५ जानेवारी रोजी सामंजस्य करार करण्यात येत आहे. हा करार करण्याकरिता टाटा समुहाचे प्रमुख रतन टाटा चंद्रपूरमध्ये येत आहेत. या कार्यक्रमाला राज्यचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवारदेखील उपस्थित राहणार आहेत. वन विभागासह जिल्हाधिकारी कार्यालयाची यंत्रणा टाटा ट्रस्टशी होणाऱ्या सामंजस्य कराराच्या सुवर्ण सोहळ्याकरिता सज्ज झाली आहे.
५ जानेवारीला घुग्घुस
बायपासचे भूमिपूजन
घुग्घुस परिसर औद्योगिकदृष्ट्या संवेदनशील आहे. या परिसरात उद्योगांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने घुग्घुसमध्ये जड वाहनांची वाहतूक दिवसभर सुरू असते. ही वाहतूक गावाबाहेरून वळविण्यासाठी आता घुग्घुसकरिता बायपास करण्यात येत आहे. त्याचे भूमिपूजन ५ जानेवारी रोजी होेत आहे. तसेच राज्याच्या ग्रामविकास मंत्रालयाच्या निधीतून ४ कोटी ६० लाख रुपयांची विकास कामे आचारसंहितेपूर्वी मार्गी लावण्याकरिता ५ जानेवारीपर्यंत भूमिपूजन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेला केंद्र व राज्य शासनाकडून प्राप्त निधीमधील कामेदेखील जोरात सुरू आहेत.