युती सरकारला शिवसैनिकांकडून घरचा अहेर
By Admin | Updated: March 8, 2015 00:35 IST2015-03-08T00:35:33+5:302015-03-08T00:35:33+5:30
राज्यातील शेतकरी दुष्काळामुळे आत्महत्येच्या मार्गाला लागला असताना राज्यातील युती सरकार आणि केंद्रातील भाजपा नेतृत्वातील सरकार केवळ शेतकऱ्यांची उपेक्षाच करीत आहे, ...

युती सरकारला शिवसैनिकांकडून घरचा अहेर
चंद्रपूर: राज्यातील शेतकरी दुष्काळामुळे आत्महत्येच्या मार्गाला लागला असताना राज्यातील युती सरकार आणि केंद्रातील भाजपा नेतृत्वातील सरकार केवळ शेतकऱ्यांची उपेक्षाच करीत आहे, असा आरोप करीत चंद्रपुरात शिवसैनिकांनी चक्क आंदोलनादरम्यान निषेधात्मक मुंडन करून आपल्याच सरकारला घरचा अहेर दिला.
आपल्या पूर्वनियोजित आंदोलनानुसार शिवसेना आमदार तथा जिल्हाध्यक्ष बाळू धानोरकर यांच्या नेतृत्वात शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धरणे देण्यात आले. या दरम्यान सरकारच्या धोरणाचा निषेध व्यक्त करून घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून राज्य सरकारला एक निवेदनही पाठविण्यात आले.
शिवसेनेने आंदोलनादरम्यान केलेल्या मागण्यांमध्ये भूसंपादन विधेयक रद्द करण्याची प्रमुख मागणी आहे. यासोबतच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दोन हेक्टरपर्यंत ९ हजार रुपये मदत, अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अतिरिक्त मदत द्या, औद्योगिक जिल्ह्यामुळे प्रदूषण असल्याने कर्मचाऱ्यांना प्रदूषण भत्ता तसेच शेतकऱ्यांच्या शेतमालाचे प्रदूषणामुळे नुकसान होत असल्याने शेतपिकांना मोबदला, स्वस्त धान्य दुकानदारांच्या समस्यांचे निराकरण आदी मागण्यांचा समावेश आहे.
सकाळी ११ वाजेपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत धरणा देण्यात आला. यात आमदार बाळू धानोरकर, सतीश भिवगडे, अनिल धानोरकर, दिलीप कपूर, किशोर जोरगेवार, राजू महाजन, बाळू चिंचोलकर, नितीन मत्ते, अनिल वनकर, प्रतिभा धानोरकर, कुसुम उदार, विलास डांगे, गजानन बुटके, प्रफुल्ल चटकी, भास्कर ताजणे, सचिन भोयर आदींचा प्रामुख्याने समावेश होता. (नगर प्रतिनिधी)