वेकोलि बल्लारपूर क्षेत्रातून आंध्र प्रदेशात कोळशाची तस्करी
By Admin | Updated: March 24, 2017 00:50 IST2017-03-24T00:50:51+5:302017-03-24T00:50:51+5:30
वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड बल्लारपूर क्षेत्रातून आंध्रप्रदेशात कोळशाची तस्करी सुरू असून वेकोलिचे अधिकारी आणि कोळसा तस्कर ..

वेकोलि बल्लारपूर क्षेत्रातून आंध्र प्रदेशात कोळशाची तस्करी
राजुरा : वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड बल्लारपूर क्षेत्रातून आंध्रप्रदेशात कोळशाची तस्करी सुरू असून वेकोलिचे अधिकारी आणि कोळसा तस्कर लाखोंचा कोळसा अवैध मार्गाने विकून लाखोंची माया जमवत आहे.
राजुरा तालुक्यातील वेकोलिमधून आंध्रप्रदेशात कोळसा चोरून नेत असल्याची माहिती मिळताच कर्तव्यदक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी शेखर देशमुख यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले. पोलीस अधिकारी रमेश ढोके, राजु मुळेवार, मंगेश जक्कुलवार, अशोक झाडे, तिरूपती जंपलवार यांनी सापळा रचून कोळसा उतरवित असताना ट्रक क्रमांक १० टि ०३९१ या ट्रकला पकडून राजुरा पोलीस ठाण्यात आणले.
राजुरा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वारंवार कोळसा चोरी होत असून दोन महिन्यात शेकडो टन कोळसा अवैध मार्गाने चोरून नेताना पोलिसांनी पकडले. यापूर्वी एमएच ३१ सीक्यु ८३९, एमएच ३२ बी २१९६, एमएच ०१ एच २८८०, एमएच ३३ जी ५४० या गाड्या कोळसा चोरी प्रकरणात पोलिसांनी पकडल्या. कोळशाची आंतरराज्यीय तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू असुन यामध्ये आरटीओची भूमिकासुद्धा संशयास्पद आहे. कोळसा तस्करावर कारवाई करण्यासाठी राजुराचे उपविभागीय पोलीस अधिकारी शेखर देशमुख यांनी कंबर कसली असून अवैध कोळसा स्टॉल, अवैध कोळसा विक्रेते यामध्ये गुंतलेली वेकोलिचे अधिकारी यांचीही चौकशी केली जात आहे. बल्लारपूर क्षेत्रामधून मुख्य महाप्रबंधक यांच्या नियोजनशून्य कार्यप्रणालीमुळे लाखोंचा कोळसा चोरीला जात आहे. त्यामुळे सर्वप्रथम वेकोलिच्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी राजुरा तालुका पत्रकार संघाने केली आहे. (शहर प्रतिनिधी)