वीज केंद्राचा कोळसा ‘रोप वे’ऐवजी पाइप कन्व्हेअरने जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:33 IST2021-02-05T07:33:54+5:302021-02-05T07:33:54+5:30
दुर्गापूर : दुर्गापुरातील जुनाट व कालबाह्य रोप वे द्वारे होणाऱ्या प्रदूषणावर मात करण्यासाठी चंद्रपूर वीज केंद्राचे मुख्य अभियंता ...

वीज केंद्राचा कोळसा ‘रोप वे’ऐवजी पाइप कन्व्हेअरने जाणार
दुर्गापूर : दुर्गापुरातील जुनाट व कालबाह्य रोप वे द्वारे होणाऱ्या प्रदूषणावर मात करण्यासाठी चंद्रपूर वीज केंद्राचे मुख्य अभियंता पंकज सपाटे यांनी ‘रोप वे’ऐवजी पर्यावरण पूरक पाइप कन्व्हेअर उभारण्याचा प्रस्ताव मंगळवारी नुकताच मुंबई महानिर्मिती मुख्यालयाला सादर केला आहे. यामुळे गेल्या ३७ वर्षांपासून प्रदूषणाची झळ सहन करणाऱ्या दुर्गापूरवासीयांना मोठा दिलासा मिळणार आहे.
चंद्रपूर महाऔष्णिक वीज निर्मिती केंद्रातील २१० मेगावाॅटच्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या क्रमांकाच्या संचाला कोळशाचा पुरवठा करण्याकरिता ३७ वर्षांपूर्वी दुर्गापूर गावात रोप वेची निर्मिती करण्यात आली. याद्वारे सध्या दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या संचाला कोळशाचा पुरवठा होत आहे. सदर रोप वे गावाच्या अगदी मध्यभागातून गेला आहे. हा जुनाट व कालबाह्य झाला आहे. त्यामुळे कोळसा पुरवठा करण्याच्या या माध्यमातून वातावरण प्रदूषित होत आहे. या प्रदूषण निवारणाकरिता येथील मुख्य अभियंता पंकज सपाटे यांनी रोप वे ऐवजी प्रदूषणरहित पाइप कन्व्हेअर व्हावा, या दृष्टीने सकारात्मक चाचपणी जरासा ही विलंब न करता संबंधित विभागाद्वारे पाइप कन्व्हेअरचा प्रस्ताव तयार करवून घेतला. लगेच हा प्रस्ताव मुंबई महानिर्मितीच्या मुख्यालयात मंजुरीकरिता सादर करण्यात आला आहे.
बाॅक्स
कोळसा वाहतुकीची पर्यावरणपूरक पद्धत
पाइप कन्व्हेअर ही पर्यावरण पूरक कोळसा वाहतुकीची पद्धत आहे. त्यामुळे येथील प्रदूषणाचा भार कमी होणार आहे. विजेची बचतही होणार. या पाइप कन्व्हेअरद्वारे ५०० मेगावाॅटचा संच क्रमांक आठ व नऊलासुद्धा कोळशाचा पुरवठा होणार आहे. कोळसा वाहतुकीतून वायू प्रदूषणाचा भार कमी करण्याकरिता अद्ययावत अशा पाइप कन्व्हेअर पद्धतीने कोळसा वाहून नेण्याची नवी संकल्पना उदयास आली. ती भटाळी कोळसा खाण ते चंद्रपूर वीज केंद्रात साकारली जात आहे. या धर्तीवरच दुर्गापुरातही रोप वे ऐवजी असाच पाइप कन्व्हेअर उभारण्यात यावा, ही बाब ‘लोकमत’ने निदर्शनास आणून देताच वीज केंद्राचे मुख्य अभियंता पंकज सपाटे यांनी यावर सकारात्मक पावले उचलली.
कोट
सध्याचा रोप वे जुना व कालबाह्य झाल्याने त्याऐवजी नव्या पर्यावरण पूरक पाइप कन्व्हेअर बनविण्याचा प्रस्ताव मुख्यालयात पाठविला आहे. यामुळे विजेच्या बचतीसह प्रदूषणाचा भार कमी होणार आहे.
- पंकज सपाटे, मुख्य अभियंता, चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र, चंद्रपूर.