चंद्रपूर : वेकोलिचे सहायक महाप्रबंधक अरुण वैद्य यांनी लिहिलेल्या खाण व्यवस्थापन कायदे आणि सामान्य सुरक्षाविषयक नवीन व्यापक दृष्टिकोन या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकाली मंदिराच्या प्रागंणात पार पडला. कोळसा खाणींचे व्यवस्थापन व सुरक्षेच्यादृष्टीने हे पुस्तक उपयुक्त ठरणार आहे.
यावेळी नागपूर वेकोलिचे महाप्रबंधक (प्लॅनिंग कार्पोरेट) तरुण श्रीवास्तव, नागपूर वेकोलिचे (सेल्स) मुख्य प्रबंधक आनंद टेंभुर्णीकर, इंटरप्रेनर मिलींद नायक, बल्लारपूर वेकोलि उपक्षेत्रीय प्रबंधक संजय मिश्रा आदींची उपस्थिती होती.
अरुण वैद्य हे मार्की मांगली कोलमाईन येथे सहायक महाप्रबंधक पदावर कार्यरत आहेत. त्यांना कोळसा क्षेत्रात दांडगा अनुभव आहे. प्रथम व द्वितीय श्रेणी खाण प्रबंधकपदासाठी व डायरेक्टर जनरल ऑफ माईन सेफ्टी यांच्यातर्फे ऑनलाइन परीक्षेचे आयोजन केले जाते. या परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित वैद्य यांचे खाण व्यवस्थापन कायदे आणि सामान्य सुरक्षाविषयक नवीन व्यापक दृष्टिकोन हे पुस्तक उपयुक्त आहे. वैद्य यांनी यापूर्वी खाण उद्योगाच्या स्पर्धा परीक्षेकरिता एमसीक्यूएस फॉर माइनिंग प्रोफेशनल हा ग्रंथ लिहिला आहे.