चंद्रपूर : कोरोना संकटामुळे मागील १८ महिन्यांपासून कोचिंग क्लास बंद आहेत. परिणामी संचालकांसह यावर अवलंबून असलेले शिक्षक, कर्मचाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. सोबतच विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने त्यांनाही येत्या काळात होणाऱ्या परीक्षांची भीती आहे. त्यामुळे इतर व्यवसायांप्रमाणे कोचिंग क्लास सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी चंद्रपूर कोचिंग क्लास असोसिएशनने पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली. या अनुषंगाने पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला ५० टक्के क्षमतेने कोचिंग क्लास सुरू करण्याची परवागी देण्याचे निर्देश दिले आहे.
जिल्ह्यात खासगी कोचिंग क्लासची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र कोरोना संकटामुळे मागील १८ महिन्यांपासून ते बंद पडले आहे. परिणामी यावर अवलंबून असलेल्या प्रत्येक घटक सध्या आर्थिक अडचणीस सापडला आहे. दुसरीकडे काही दिवसावर मेडिकल, इंजिनिअरिंग, ॲग्रिकल्चर, ऑर्किटेक्चर, फार्मसीच्या प्रवेशप्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी कोचिंग क्लास सुरू करण्याची मागणी चंद्रपूर कोचिंग क्लास असोसिएशनने पालकमंत्र्यांकडे केली. यासंदर्भात पालकमंत्र्यांनी ५० टक्के क्षमतेने कोचिंग क्लास सुरू करण्याची मान्यता द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. त्यामुळे कोचिंग क्लास संचालकांनी समाधान व्यक्त केले आहे.