खेळ दाखविताना गारुड्याला सापाचा दंश
By Admin | Updated: September 9, 2016 00:47 IST2016-09-09T00:47:58+5:302016-09-09T00:47:58+5:30
अनेक समाज आपले पिढीजात असलेले पारंपारिक व्यवसाय करुन आपल्या परिवाराचे पालनपोषण करतात.

खेळ दाखविताना गारुड्याला सापाचा दंश
चिमूर : अनेक समाज आपले पिढीजात असलेले पारंपारिक व्यवसाय करुन आपल्या परिवाराचे पालनपोषण करतात. पुर्वजापासून अवगत केलेली साप पकडण्याची कला मारोती पत्रु नान्हे यांच्या संसाराचा गाडा चालविण्याचे साधन ठरले. मात्र अनेक वर्ष सापाचा खेळ दाखवून उपजिविका भागविण्यास मदत करणाऱ्या सापाने असाच खेळ दाखविताना दंश केल्याने गारुड्याला आपल्या जिवास मुकावे लागले. ही घटना चिमूर येथील नेताजी वॉर्डात मंगळवारी सकाळी घडली.
चिमूर शहरातील नेताजी वॉर्डात नदीच्या किनाऱ्यावर एक लहानश्या झोपडीमध्ये वास्तव्य करणारे मारोती नान्हे यांच्या परिवारात पत्नी व तीन मुले असा परिवार आहे. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने पुर्वजाकडून अवगत केलेली साप पकडण्याची कला व या सापाचा खेळ दाखवून परिवाराचा उदरनिर्वाह चालायचा. या कलेच्या माध्यमातून मारोतीने आजपर्यंत शेकडो सापांना पकडून जंगलात सोडले. त्यामुळे साप पकडणे व त्यांचा खेळ दाखविणे हे त्याचे नित्याचेच काम झाले होते. मारोती व साप हे दोघेही एकमेकांचे मित्र असल्यासारखे होते. मात्र हा सापच त्याच्या जीवनात काळ ठरणार, ही तिळमात्र कल्पना मारोतीला नव्हती. मंगळवारच्या सकाळी नेहमीप्रमाणे सापाची टोपली घेऊन मारोती घराबाहेर पडला. काही अंतर गेल्यावर नेताजी वॉर्डातील चौकात सापाचा खेळ दाखविण्यापूर्वीच साप टोपलीच्या झाकणाला धक्का देत बाहेर आला. तेव्हा मारोतीने सापाला हाताने पकडले. मात्र या सापाने गारुड्याच्या छातीला चावा घेतला. यामुळे काही वेळाने गारुडी मारोती नान्हे जमिनीवर कोसळले. आजूबाजूला जमलेल्या नागरिकांनी त्यांना उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे उपचाराकरिता दाखल केले असता गारुड्याचा उपचारादरम्यान दुदैवी मृत्यू झाला. (प्रतिनिधी)