ढगाळ वातावरणाचा हरभरा पिकाला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:39 IST2020-12-30T04:39:06+5:302020-12-30T04:39:06+5:30
चंद्रपूर : जिल्ह्यात काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने हरभरा पिकावर अळीचा प्रादूर्भाव झाला. या वातावरणामुळे हरभरा पीक वाया ...

ढगाळ वातावरणाचा हरभरा पिकाला फटका
चंद्रपूर : जिल्ह्यात काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने हरभरा पिकावर अळीचा प्रादूर्भाव झाला. या वातावरणामुळे हरभरा पीक वाया जाण्याची भिती शेतक-यांनी वर्तविली आहे.
यावर्षी सुरुवातीला शेतकºयांना ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागला. यानंतर परतीच्या अवकाळी पावसाने घात केला. खरीप हंगामातील पिके ऐन कापणीच्या अवस्थेत असतानाच पावसाने थैमान घातले. त्यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले.
या संकटातून सावरुन शेतकºयांनी उधार-उसणवारी करीत रब्बी हंगामातील गहू, हरभरा या पिकाची पेरणी केली. जिल्ह्यात हरभरा पिकाचा पेरा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र काही दिवसांपासून ढगाळ वातावरण व पहाटे पडणारे दाट धुके पडत आहेत. अशा हवामान बदलामुळे या पिकाला जोरदार फटका बसण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. खरीपातून पुरेसे उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे रब्बी पिकही वाया जाते की काय अशी भीती शेतक-यांना सतावत आहे.
यावर्षी निसर्गाने साथ न दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अशीच स्थिती राहिल्यास शेतक-यांनी जगायचे कसे, असा प्रश्न विचारला जात आहे.
कृषी विभागाकडून सर्वेक्षण
वरोरा, भद्रावती, गोंडपिपरी, राजुरा, मूल, सिंदेवाही, नागभीड तालुक्यातील शेतक-यांनी कीडीबाबत माहिती दिल्यानंतर कृषी विभागाच्या पथकाने सर्वेक्षण सुरू केले. अन्य तालुक्यातही हेच वातावरण असल्याने जिल्ह्यात सर्वत्रं मोहीम सुरू करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.