बंद रेल्वे गेटमुळे नागरिक त्रस्त
By Admin | Updated: July 30, 2015 00:59 IST2015-07-30T00:59:17+5:302015-07-30T00:59:17+5:30
राजुरा रेल्वे गेट बंद असल्यामुळे नागरिकांना अनेक वर्षांपासून अडचणीचा सामना करावा लागत आहे.

बंद रेल्वे गेटमुळे नागरिक त्रस्त
देवाडा : राजुरा रेल्वे गेट बंद असल्यामुळे नागरिकांना अनेक वर्षांपासून अडचणीचा सामना करावा लागत आहे. अनेकवेळा हे फाटक बंद राहत असते. या मार्गात अनेक प्राथमिक आरोग्य केंद्र असून देवाडा- चिंचोली, विरुर स्टे. व जिवती तालुक्यातील नागरिक याच मार्गाने जातात.
महाराष्ट्राच्या सीमेला तेलंगाणा राज्याची सीमा असून तेलंगाणाच्या रुग्णवाहिकेलाही फाटक उघडेपर्यंत ताटकळत राहावे लागत असते. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. देवाडाच्या २० कि.मी अंतरावर राजुरा मार्गावर एक रेल्वे गेट आहे. या मार्गावरुन नेहमीच मोठ्या प्रमाणात वाहनांचे आवागमन होत असते. मात्र या वर्दळीच्या मार्गावरील रेल्वे गेट नेहमीच अनेकवेळा बंद राहते. त्यामुळे या ठिकाणी अनेक वेळा वाहतुकीची कोंडी निर्माण होते. याचा फटका अनेक नागरिकांना बसत असतो. त्यामुळे रेल्वे गेट सध्या नागरिकांसाठी डोकेदुखीचे ठरले आहे.
राजुरा तालुक्यातील ग्रामीण भागात वेगवेगळे ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र असून रुग्णांना उपचार करण्याकरीता त्यांना जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये भरती करण्यात येतो. परंतु आरोग्य केंद्रात औषधीच्या साठा नसल्यामुळे त्यांना पुढील उपचार करण्याकरिता ग्रामीण रुग्णालय राजुरा किंवा जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे हलविण्यात येतो.
नेहमीप्रमाणे राजुरा मार्गावरील रेल्वे गेट सतत बंद राहत असल्याने त्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी निर्माण होते. यासोबतच कॉलेज, शासकीय आयटीआय, एस.टी. महामंडळ आगार, वनविभाग बगिचा, पोलीस विभाग कार्यालय, न्यायमंदिर, तहसील कार्यालयात पोहचण्यात या गेटमुळे अडचणी येत असतात. येथे व्यवस्था करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. (वार्ताहर)